खंडपीठासाठी वकिलांचे उपोषण

By admin | Published: August 19, 2016 11:35 PM2016-08-19T23:35:05+5:302016-08-20T00:18:49+5:30

जिल्ह्यात लढा तीव्र : सांगली, इस्लामपूर, मिरजेत धरणे आंदोलन

Advocates fasting for the Bench | खंडपीठासाठी वकिलांचे उपोषण

खंडपीठासाठी वकिलांचे उपोषण

Next

 सांगली : मुंबई उच्च न्यायालयाचे सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ कोल्हापुरात करावे, या मागणीसाठी सांगली वकील संघटनेच्यावतीने शुक्रवारी स्टेशन चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. जोपर्यंत सर्किट बेंच व खंडपीठ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकिलांचे सर्किट बेंच व खंडपीठासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरु आहे. दोन वर्षापूर्वी तब्बल महिनाभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून न्यायालयाच्या आवारात चक्री उपोषण सुरु ठेवले होते. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने याप्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात सहा जिल्ह्यांतील वकिलांची कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सांगली वकील संघटनेच्यावतीने स्टेशन चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. हरिष प्रताप, प्रमोद भोकरे, एस. टी. जाधव, अतुल डांगे, जुलेखा मुतवल्ली, स्वाती सूर्यवंशी, पल्लवी कांते, राजू चौगुले, विक्रांत वडेर आदी सहभागी झाले होते. सायंकाळी पाच वाजता आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
इस्लामपूर : इस्लामपूर वकील संघटनेतर्फे शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शुक्रवारी सकाळपासून येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी ठिय्या मारून, कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, अशी जोरदार मागणी केली. उपोषणस्थळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, मनसेचे घन:शाम जाधव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी खंडपीठाच्या मागणीस पाठिंबा व्यक्त केला.
वकील संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले, न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबई येथे जाणे गैरसोयीचे आणि आर्थिक भुर्दंड बसविणारे आहे. यावेळी सुनील पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, सदस्य संदीप पाटील, मनोज राजवर्धन, धनाजी पाटील, अमोल पाटील, शरद हळदे पाटील, बी. डी. पाटील, जे. एस. पाटील, ए. डी. माळी, पी. टी. जाधव, एस. यु. संदे, नितीन पाटील उपस्थित होते.
मिरज : मिरज वकील संघटनेतर्फे न्यायालयाच्या प्रवेशद्वारात लाक्षणिक उपोषण झाले. कामकाजावर बहिष्कार न टाकता वकिलांनी आंदोलन केले. वकील संघटनेचे अध्यक्ष सुनील नांद्रे, प्रवीणा हेटकाळे, सुरेश दोडवाड, राजू शिरसाट, किरण जाबशेट्टी, के. सी. दुधगावे, उमेश बावचीकर, महेश हुक्कीरे, वासुदेव ठाणेदार, रामसिंग रजपूत, अफसर हंगड आदी आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)


कामकाज सुरू
वकिलांंकडून राजवाडा चौक किंवा न्यायालयाच्या आवारात आंदोलन केले जाते. पण शुक्रवारच्या आंदोलनावेळी त्यांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला नव्हता. त्यामुळे स्टेशन चौकात आंदोलन केले. त्यामुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत सुरू होते.

५कामगार न्यायालयातील वकिलांचा सहभाग
'कामगार न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलांनीही उपोषण केले. यामध्ये अ‍ॅड. के. डी. शिंदे, डी. एस. यादव, एस. एस. मुतालिक, यु. आर. जाधव, एन. एम. जगदाळे, बी. आर. मुलाणी, एस. जी. जमखंडे, जी. बी. पाटील, डी. एम. दळवी, एस. एस. गायकवाड आदी सहभागी झाले होते.

Web Title: Advocates fasting for the Bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.