सहा जिल्ह्यांतील वकील ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार
By संतोष.मिठारी | Published: September 21, 2022 11:16 PM2022-09-21T23:16:34+5:302022-09-21T23:16:41+5:30
‘सर्किट बेंच’साठीचा लढा तीव्र करणार : कोल्हापुरात खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठीचा लढा तीव्र करण्यातील पहिला टप्पा म्हणून दि. ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्धार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वकिलांनी केला. या दिवशी एकाच वेळी मोर्चा काढून जिल्हाधिकारी, तहसीलदारांना एका ओळीचे निवेदन देण्याचा निर्णय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
येथील न्यायसंकुलातील कक्ष क्रमांक एकमध्ये सर्किट बेंचप्रश्नी खंडपीठ कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके होते. बैठकीच्या प्रारंभी कृती समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक धैर्यशील पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, प्रतिनिधींनी सर्किट बेंचबाबतच्या लढ्याच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानंतर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे उपाध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक विवेक घाटगे यांनी सर्किट बेंचच्या मागणीसाठी कृती समितीचा गेल्या ३५ वर्षांपासून सबुरीने लढा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आता आम्हाला भेट नको आहे, तर मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची रीतसर बैठक व्हावी. त्यासाठी सर्व विभागांचे सचिव उपस्थित असणे आवश्यक आहे. आता लढा निर्णायक टप्प्यावर आला असून तो अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून दि. ७ ऑक्टोबरला सहा जिल्ह्यांतील वकील हे न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील. जिल्हाधिकारी, तहसीलदारांना माननीय मुख्यमंत्री यांनी सहा जिल्ह्यांतील दीड कोटी जनतेचा कोल्हापुरातील सर्किट बेंच प्रश्न सोडविण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा, अशा मागणीचे निवेदन देण्याबाबतचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी दिली.
यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे संग्राम देसाई, शिवाजी मर्ढेकर, दिलीप पाटील (सातारा), दिलीप धारिया (रत्नागिरी), भगवानराव मुळे (पंढरपूर), उमेश सावंत (सिंधुदूर्ग), नितीन खराडे (माळशिरस), डी. जी. मेटकरी (सांगोला), वसंत माने (फलटण), प्रशांत जाधव (सांगली), दिग्विजय पाटील (इस्लामपूर), शौर्या पवार (विटा), विश्वास चिडमुंगे (इचलकरंजी), अमरसिंह भोसले, महादेवराव आडगुळे, आदींनी सूचना केल्या.
यावेळी कोल्हापूर बारचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, संदीप चौगुले, प्रशांत चिटणीस, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, संपतराव पवार पाटील, रवींद्र जानकर, गुरुप्रसाद माळकर, विजय महाजन, धनंजय पठाडे, प्रमोद जाधव, मीना पवार, दिलीप ढगे, प्रकाश मोरे, प्रमोद दाभाडे, आदी उपस्थित होते. कृती समितीचे सचिव विजयकुमार ताटे-देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.