वकिलांना फटकारले

By admin | Published: May 5, 2016 01:03 AM2016-05-05T01:03:41+5:302016-05-05T01:05:53+5:30

अमोल पवार प्रकरण : सावकार गैरहजर ; सावकारांच्या वकिलांबाबत न्यायालय सक्त

Advocates shouted | वकिलांना फटकारले

वकिलांना फटकारले

Next

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला दहा ते ३0 टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून त्याची स्थावर मालमत्ता लिहून घेणारे बारा संशयित सावकार अटकेच्या भीतीने बुधवारच्या सुनावणीस गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी सावकारांच्या वकिलांना फटकारत सुनावणी तहकूब ठेवली. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाची माफी मागत पुढील सुनावणीला सावकारांना हजर करण्याची ग्वाही दिली. त्यावर न्यायाधीश वेदपाठक यांनी उद्या, शुक्रवारी सुनावणी ठेवली.
संशयित सावकार पांडुरंग आण्णासो पाटील, प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, जयसिंग बाबूराव जाधव, नीलेश जयसिंग जाधव, रणजित अशोक चव्हाण, विकास कृ ष्णात खोत, बिपीन ओमकार परमाळ, अशोक बाबूराव तनवाणी, मोनिका प्रशांत सावंत, प्रशांत शिवाजीराव सावंत, प्रफुल्ल आण्णासो शिराळे, आदींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यास न्यायाधीश वेदपाठक यांनी या सावकारांना अंतरिम जामीन मंजूर केला. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सरकारी वकिलांतर्फे न्यायालयातील सुनावणी व निकालावेळी संशयित आरोपींनी हजर राहावे, असा विनंती अर्ज न्यायालयास केला होता. त्यास आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने या सर्वांना सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले. पहिल्या सुनावणीला सर्व सावकार उपस्थित होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश वेदपाठक यांच्या दालनात बुधवारी सुनावणी झाली. सुरुवातीस सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी सुनावणीस किती आरोपी उपस्थित आहेत, असा मुद्दा मांडला. त्यावर आरोपीचे वकील धनंजय पठाडे, चंद्रकांत बुधले, पिटर बारदेस्कर, विराज नलवडे, विवेक शुल्क, विद्याधर पाटील, चंद्रकांत पाटील, आदींनी आरोपी निकालाच्या अंतिम सुनावणीस हजर राहतील. तोपर्यंत ते न्यायालयात येणार नाहीत, असे सांगितले. अ‍ॅड. पिरजादे यांनी आक्षेप घेत हा न्यायालयाचा अवमान आहे. आदेश असतानाही आरोपी हजर राहत नाहीत. त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? सामान्य माणसालाही कायदा सर्वांसाठी समान आहे, त्याचे पालन केले पाहिजे, असे वाटले पाहिजे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा, असा युक्तिवाद मांडला. त्यावर न्यायाधीश वेदपाठक यांनी आरोपीच्या वकिलांना फटकारत सुनावणी तहकूब ठेवली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी आमचा गैरसमज झाला. निकालावेळी आरोपींना हजर करता येईल, असे आम्ही समजत होतो.

प्रकाश टोणपेचा अर्ज फेटाळला
संशयित सावकार प्रकाश टोणपे याने विविध कारणे दाखवून न्यायालयाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आपल्याला हजर न राहण्यास सवलत मिळावी, असा अर्ज वकील विद्याधर पाटील यांच्यावतीने केला होता. त्यावर न्यायाधीश वेदपाठक यांनी कोणतीही सवलत मिळणार नाही, असे खडे बोल सुनावत अर्ज फेटाळला.

Web Title: Advocates shouted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.