आप्पाचीवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प लालफितीत अडकला
By admin | Published: May 9, 2017 12:25 AM2017-05-09T00:25:46+5:302017-05-09T00:25:46+5:30
निधीअभावी प्रकल्प रखडणार ? : प्रकल्पाकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, लोटेवाडी, म्हसवे येथील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी न्यायालयात धाव घेतल्याने नऊ वर्षे रखडलेला भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प सुधारित निधीअभावी ठप्प होत चालल्याने या भागाचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाने या प्रकल्पासाठी सुधारित निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे
मिणचे खोरीतील लोटेवाडी, आप्पाचीवाडी, पंडिवरे, बसुदेव धनगरवाडा, मिणचे बुद्रुक, नवरसवाडी, मोरस्करवाडी, बोगार्डेवाडी या जिथे पाण्याचा कुठलाच स्रोत नाही अशा दुर्गम डोंगराळ भागातील गावांतील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पास २००७ साली शासनाच्या जलसंधारण विभागाने मंजुरी दिली. २७.५७ मी. उंची, ३ मीटर रुंदी, २६५ मी. लांबी, साठवण क्षमता १३८९ घनमीटर, सांडवा ३५ मीटर व कालवा ४ कि.मी. व १५५ हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाचा ४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च प्रारंभीस मंजूर केला होता. हा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे सुटला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेली नऊ वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले होते. पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले, पण जेवढा निधी मिळाला, तेवढेचे काम झाल्याचे संबंधित खात्याचे म्हणणे आहे. उर्वरित कामासाठी सुधारित अंदाजपत्रक २० कोटी, ५४ लाख रुपये केले आहे. गेल्या नऊ वर्षांत ४ कोटींचा प्रकल्प २० कोटी ५४ लाखांवर गेला आहे. संबंधित खात्याने सुधारित निधीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवला आहे. एवढा मोठा निधी उपलब्ध होईपर्यंत पुढील काम पूर्णत: थांबणार आहे. या प्रकल्पामुळे लोटेवाडी, बोगार्डेवाडी, आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, मोरस्करवाडी, नवरसवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. माजी आमदार बजरंग देसाई यांनी लोंडवीर देवालय येथे पाणी परिषद घेऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनीही या प्रकल्पाच्या कामाचा गांभीर्याने विचार केला नाही.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात
आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघून शेतीचे रूपांतर कोरडवाहूतून निघून हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे. शासन दरबारी या प्रकल्पाला निधी मंजूर झाल्यास प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यासाठी योग्य अंमलबजावणीची नितांत गरज आहे.