लॉकडाऊनमुळे पैलवानांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:30+5:302021-04-21T04:25:30+5:30
इचलकरंजी : कुस्तीची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात पैलवानांची खाण आहे. परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जत्रा, उरूस, म्हाई व अन्य निमित्ताने ...
इचलकरंजी : कुस्तीची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात पैलवानांची खाण आहे. परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जत्रा, उरूस, म्हाई व अन्य निमित्ताने होणाऱ्या कुस्ती स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. परिणामी पैलवानांची परवड होत असून, त्यांना खुराक व सराव कमी पडण्याबरोबरच काही जणांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात, महाराष्ट्र केसरीपासून हिंदी केसरीपर्यंतची स्वप्ने पाहत त्यासाठी वर्षभर कष्ट करणाऱ्या पैलवानांवर आज बेकारीची कु-हाड कोसळली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पैलवानांना व्यायाम, कसरत, सराव करणे अवघड बनले आहे. त्याचबरोबर यात्रा, उरूस व अन्य निमित्ताने होणाऱ्या कुस्त्या रद्द झाल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न थांबले आहे. त्याचा परिणाम पैलवानांच्या खुराकवर झाला आहे. पैलवानांना दूध, बदाम, तूप, फळे, मांसाहार यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. पैलवान हे सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना हा खर्च भागवणे शक्य नाही. परिणामी अनेकांना कुस्ती सोडून मोलमजुरी करावी लागत आहे. राजर्षी शाहूंच्या भूमीमध्ये पैलवानांची अशी वाताहात होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी, उद्योगपती, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी लक्ष घालून भरीव तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.