Kolhapur- नशिबाने वाचलो, शत्रूवरही नको अशी वेळ; बालिंगा दरोड्यातील सराफ अजूनही धक्क्यात

By उद्धव गोडसे | Published: September 13, 2023 11:52 AM2023-09-13T11:52:22+5:302023-09-13T11:54:04+5:30

एकट्याने दुकानात थांबायची भीती वाटते

Afraid to wait in the shop alone, Saraf in Balinga robbery still in shock Kolhapur | Kolhapur- नशिबाने वाचलो, शत्रूवरही नको अशी वेळ; बालिंगा दरोड्यातील सराफ अजूनही धक्क्यात

Kolhapur- नशिबाने वाचलो, शत्रूवरही नको अशी वेळ; बालिंगा दरोड्यातील सराफ अजूनही धक्क्यात

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : ‘तीस वर्षांत कधी घडली नव्हती अशी घटना घडली आणि आमचे संपूर्ण कुटुंबच हबकले. दुकानावर पडलेल्या दरोड्यातून जिवंत राहू, असे वाटले नव्हते. नशिबाने वाचलो. अजून एकट्याने दुकानात थांबायची भीती वाटते. तो दिवस आठवला की आजही थरकाप उडतो, अशी वेळ शत्रूवरही येऊ नये,’ अशी भावना बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४८, रा. बालिंगा) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरोड्यातील परप्रांतीय गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागल्यामुळे तपासाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी आठ जूनला भरदिवसा सशस्त्र दरोडा घालून दुकानातील एक कोटी ८७ लाखांचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. दरोडेखोर केवळ लूट करून थांबले नाहीत, तर त्यांनी सराफ रमेश माळी आणि त्यांचा मेहुणा जितेंद्र माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. रमेश यांच्या डोक्यात बेसबॉलच्या स्टिकने मारल्यामुळे ते बेशुद्ध पडले. जितेंद्र यांच्या मांडीत गोळी लागली. दरोड्याच्या घटनेला तीन महिने उलटले, तरी अजूनही संपूर्ण माळी कुटुंब धक्क्यातून सावरलेले नाही. रमेश माळी दुकानात जाऊन बसतात. मात्र, एकट्याने दुकानात थांबायची त्यांना भीती वाटते. कधी कधी रात्री मधेच जाग येते आणि तो प्रसंग आठवून झोप उडते, असेही ते सांगतात.

मांडीत गोळी लागून गंभीर जखमी झालेले जितेंद्र माळी यांना अजूनही स्वत:हून चालता येत नाही. त्यांना राजस्थानला गावाकडे पाठवले आहे. दुकानात नातेवाइकांमधील दोन कामगार वाढवले असून, लवकरच सुरक्षा रक्षकही तैनात करणार असल्याचे सराफ माळी यांनी सांगितले.

घरातील सर्वांनाच धक्का

दरोड्याची घटना जवळून पाहणारा माळी यांचा मुलगा खूपच घाबरला होता. त्याला धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला. घरातील महिलांचीही स्थिती काहीशी अशीच झाल्याचे माळी यांनी सांगितले.

अंदाजे ४० टक्के दागिने मिळाले

दरोडेखोरांनी एक कोटी ८७ लाखांचे दागिने पळवले होते. त्यापैकी अंदाजे ४० टक्के दागिने परत मिळाले. पोलिसांनी परप्रांतीय दरोडेखोराला अटक केल्यामुळे पसार असलेले इतर आरोपीही सापडतील, असे माळी यांना वाटते. पोलिसांच्या तपासावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

सर्वस्व गेले; तरीही खचले नाहीत

दरोड्यात आयुष्यभराची कमाई गेल्यानंतर माळी यांना त्यांच्या पाच भावंडांनी आधार दिला. कठीण प्रसंगात करवीर सराफ असोसिएशन त्यांच्यासोबत होते. नातेवाईक आणि मित्रांनी पाठबळ दिल्यामुळेच आपण पुन्हा दुकान सुरू करू शकलो, असे त्यांनी सांगितले. हा त्यांचा लढाऊ बाणा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Web Title: Afraid to wait in the shop alone, Saraf in Balinga robbery still in shock Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.