तब्बल १८ वर्षांनंतर आई-मुलाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:01 AM2018-04-26T01:01:41+5:302018-04-26T01:01:41+5:30
जहॉँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत असताना त्याच्या नातेवाइकांचा शोध लागला. तब्बल १८ वर्षांनंतर या आई-मुलाची आणि बहीण-भावाची भेट झाली. चित्रपटातील एका कथेप्रमाणे हा प्रवास घडला आहे विजय सुरेश उबाळे (मूळ गाव दानोळी, ता. हातकणंगले) या युवकाचा.
१९९९ च्या सुमारास विजय याची आई छाया ही कौटुंबिक वादातून माहेरी मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघून गेली. तिच्यासोबत त्याच्या दोन बहिणी शिल्पा आणि चैताली यादेखील गेल्या. तेव्हा विजय पाच ते सहा वर्षांचा असेल, तर बहिणींचे वय आठ आणि दुसरीचे दहा असे होते. वडिलांनी मुलगा म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. नंतर काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक वाद इतका टोकाचा होता की, आई अंत्यविधीलाही येऊ शकली नाही. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विजयला मिरजेच्या अनाथालयात ‘अनाथ’ म्हणून दाखल केले गेले. तेथून दोन वर्षांनंतर त्याची कोल्हापुरात बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. तेथे काही वर्षे गेल्यानंतर तो कणेरीवाडी येथील अनाथालयात आला. लहान वयात ‘अनाथ’ असल्याचा पक्का समज त्याच्या डोक्यात बसल्याने तसेच त्याच्याकडे कोण नातेवाईकही फिरकले नसल्याने विजय हादेखील सर्व विसरून गेला. बघता बघता ही दहा वर्षे निघून गेली. दहावी परीक्षेनंतर त्याला निरीक्षणगृहातून बाहेर पडावे लागले. कागलमध्ये बाल निरीक्षण गृह चालविणाऱ्या प्रशांत वाळवेकरांनी त्याला आधार दिला. ‘अनाथ’ म्हणून सर्वजण त्याला सहानुभूती दाखवत. वनमित्र संघटनेचे अशोक शिरोळे, सुनील जाधव, आदींनी त्याचे वय लक्षात घेऊन त्याचे लग्न करून द्यावे असा विचार केला. त्यासाठी त्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाल निरीक्षण गृहातील कागदपत्रे तपासता तपासता ते थेट पोहोचले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात. तेथे त्याचा ‘दानोळी’ गावचा पत्ता मिळाला. दानोळीत गेल्यानंतर सर्व भाऊबंद सापडले, तर त्या ठिकाणी आईचा पत्ता सापडला आणि अशोक शिरोळे, सुनील जाधव हे विजयला घेऊन तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावात पोहोचले आणि ही १८ वर्षांची ताटातूट अखेर संपुष्टात आली.
बहिणींची लग्नेही झाली
विजयची आई छाया हिने माहेरी राहून काबाडकष्ट करून दोन्ही मुलींना मोठे केले. मुलगा कोठेतरी हरवून गेला आहे असे समजून त्यांनी चौकशी सोडली. सासरी दानोळीला येण्यास मनाईच होती आणि भाऊ या परिसरातच असताना दोन्ही बहिणींची लग्नेही झाली. त्यांचा संसार सुखात सुरू आहे. १८ वर्षांनंतर भेटलेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आलेच, पण लेकीच्या लेकाला पाहून वृद्ध भामाबार्इंनाही आसवे रोखता आली नाहीत.