तब्बल २0 वर्षांनंतर कवठेगुलंदला आरोग्य केंद्र
By admin | Published: October 27, 2016 06:55 PM2016-10-27T18:55:47+5:302016-10-27T19:25:40+5:30
जागेची तांत्रिक अडचण झाली दूर : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इमारत पायाखुदाई
अजित चंपुणावर --बुबनाळ --नदी पलीकडील बुबनाळसह आलास, शेडशाळ, गणेशवाडीसह सात गावांंसाठी तब्बल २0 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे आरोग्य केंद्र अल्पावधीतच नागरिकांच्या सेवेसाठी येत असून, या भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कवठेगुलंद येथील गेली २० वर्षे प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास चार कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी या केंद्रासाठी एक कोटी २० लाखांचा निधीही प्राप्त झाला होता. मात्र, केवळ जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्याची तांत्रिक अडचण होती. माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक व आलास जिल्हा परिषद सदस्या सुनंदा दानोळे यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. कवठेगुलंद ग्रामपंचायतीने गट नं. २६८ मधील ०-९३ आर जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे केल्याने ही तांत्रिक अडचणही दूर झाली.
दरम्यान, शासकीय आरोग्य सेवासुविधा मिळावी, यासाठी कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे प्रलंबित होता. आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, कार्यवाहीविना ते कागदावरच राहिले होते. नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावांसाठी आरोग्य उपकेंद्रे आहे. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी ठरत होत्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना एकतर नृसिंहवाडी, कुरुंदवाड अथवा जयसिंगपूर, मिरज, सांगली या ठिकाणी उपचारांसाठी जावे लागत होते.
एकीकडे कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, कार्यवाही का होत नाही? फक्त आरोग्य केंद्र मंजुरीचे आश्वासन मिळत होते. दानोळे व मादनाईक यांच्या पाठपुराव्याला खास. शेट्टींचे सहकार्य मिळाले. परिणामी, २० वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली निघाला. या आरोग्य केंद्रास चार कोटींचा निधीही मंजूर होऊन एक कोटी ९० लाखांचा निधी प्रत्यक्षात मिळाला. जागेची तांत्रिक अडचण कवठेगुलंद ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करून दूर केली. त्यामुळे नव्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.
गेल्या २0 वर्षांहून अधिक काळ कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न प्रलंबित होता. जागेची तांत्रिक अडचणही दूर झाल्यामुळे इमारत बांधकामासाठी जी आवश्यक प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पायाखुदाई कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आठ ते दहा महिन्यांत सुसज्ज अशा सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवासुविधांसह प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी सज्ज होणार आहे.
- सुनंदा दानोळे, जि. प. सदस्या, आलास.