...अखेर २६ तासांनंतर रेल्वे रुळावर
By admin | Published: April 24, 2015 01:08 AM2015-04-24T01:08:11+5:302015-04-24T01:10:07+5:30
मिरज-पुणे रेल्वेमार्ग : पाचशे कामगारांनी दिवसरात्र केले काम
आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावर बुधवार, दि. २२ रोजी पहाटेच्या सुमारास मालगाडीचे १६ डबे घसरून भीषण अपघात वाठार-आदर्की रेल्वे स्थानकादरम्यान झाल्याने या मार्गावर सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर गुरुवार, दि.२३ रोजी दोन क्रेन, तीन जेसीबी, ४०० रेल्वे कर्मचारी, ५०० हमाल अशी मोठी फौज रेल्वे प्रशासनाने उभी करून दिवस-रात्र युद्धपातळीवर काम करून सकाळी सात वाजता तब्बल २६ तासांनंतर रेल्वेलाईन सुरळीत करण्यात यश आले.
मिरज-पुणे लोहमार्गावर आदर्की, ता. फलटण येथे सांगलीहून गुहाटी (आसाम)कडे रायगाव शुगर
वर्क्सची साखर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरून रेल्वे प्रशासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
बुधवारी पहाटे अपघात घडल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांनी मिरज व दौंड येथून अपघात मदत पथक व दोन क्रेन, तीन जेसीबी दोन छोटी क्रेन व ५०० हमाल बोलावून अपघातग्रस्त माल डब्यातून साखर बाहेर काढून काही डबे क्रेनच्या साह्याने बाहेर काढले तर काही गॅस कटरने तोडून बाहेर काढण्यात आले.
तीव्र उन्हामुळे व कामगारांना वेळेत जेवण न मिळाल्यामुळे काम मंदगतीने सुरू
होते.
लाईनवर १० डब्यांपैकी सायंकाळी सातपर्यंत सहा डबे बाहेर काढले. त्यानंतर सहा जनरेटरद्वारे दिव्याचा प्रकाश प्लॅश बोर्डवर पाडून १५० कामगारांनी सकाळी सात वाजेपर्यंत रेल्वेलाईन सुरळीत रेल्वे गाड्या सोडण्यात आले. गुरुवारी रेल्वेलाईन बाहेर गेलेल्या माल डब्यातून साखर काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)