३५ वर्षांनंतर घरी कन्यारत्न, हत्तीवरून मिरवणूक काढत चिमुकलीचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 12:09 PM2023-05-28T12:09:25+5:302023-05-28T12:09:41+5:30
लेकीच्या स्वागतासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटण्यात आले. रं
ज्योती पाटील
पाचगाव (जि. कोल्हापूर) : कोल्हापूरनजीकच्या पाचगावमध्ये एका कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर घरात जन्मलेल्या मुलीचे शनिवारी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. लेकीच्या स्वागतासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटण्यात आले. रंगीबेरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यांमध्ये लाडक्या ईरा या लेकीचा गृहप्रवेश करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्वागताची पाचगावसह जिल्ह्यात चर्चा सुरू
आहे.
पुण्यातील आयटी कंपनीत असलेले गिरीश पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा या दाम्पत्याला २९ डिसेंबर २०२२ रोजी कन्यारत्न झाले. त्यांच्या कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर मुलगी जन्माला आल्याने आनंदाला पारावार उरला नाही. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच शनिवारी पाचगाव येथे आपल्या घरी आलेल्या ईरा व तिच्या आईचे स्वागत हत्तीवरून स्वार होत, सनई-चौघड्यांच्या सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. स्वागत मिरवणुकीत पाटील कुटुंब, सर्व नातेवाईक व परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.
आमच्या घरात ३५ वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे. सर्व कुटुंब खूप आनंदी आहे. या आनंदात नातीचे स्वागत केले. मुलगा-मुलगी एकसमान आहेत. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे. हे पाप व्हायला नको, यासाठी जागृती झाली पाहिजे.
आनंदी पाटील,
मुलीची आजी