पेरीडमध्ये ६५ वर्षांनंतर बिनविरोधला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:37+5:302021-01-14T04:19:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : पासष्ट वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पासष्ट वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. आजपर्यंत गावात कोणतीच निवडणूक न लागता सुकाणू समिती सांगेल त्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळत होती. एका जागेसाठी निवडणूक असली तरी गावात कुठेही निवडणुकीचे वातावरण नाही.
पेरीड ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ ला झाली. तेव्हापासून गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. गावात सेवा संस्था, दूध संस्था असून या संस्थांच्या निवडणुकाही लागलेल्या नाहीत. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात बिनविरोध निवडणुकीसाठी पेरीड गाव प्रसिद्ध होते. चालू वर्षी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदैवताच्या मंदिरात ग्रामस्थांची बैठक बोलावून नऊ सदस्य निवडण्यात आले. मात्र, सुकाणू समितीने घेतलेला निर्णय एका अपक्ष उमेदवाराला मान्य नसल्यामुळे त्याने अर्ज दाखल केला. अर्ज माघार न घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. गावात निवडणूक लागली असली तरी, निवडणुकीचे वातावरण नाही. अपक्ष उमेदवाराने आपली प्रचार पत्रके प्रभागामध्ये वाटली आहेत.
.............
कोट....
गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासकामे केली तरच लोकशाही टिकणार आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे शासनाचा निवडणुकीवर होणारा खर्च विकासकामांसाठी खर्च करणे शक्य होते.
संजय पाटील ,
सरपंच पेरीड
...............
गावच्या विकासासाठी मी निवडणुकीत उभा आहे. सुकाणू समितीकडे तीन वेळा उमेदवारीची मागणी करूनही मला उमेदवारी नाकारली, म्हणून मी रिंगणात आहे.
पंडित केसरे
अपक्ष उमेदवार
............
फोटो १३ पेरीड
पेरीड (ता. शाहूवाडी) येथे एका जागेसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असली तरी गावात निवडणुकीचे कोणतेच वातावरण दिसत नाही.