दुर्मिळ घटना! तीन दिवसाच्या अंतराने म्हशीने दिला दुसऱ्या रेड्याला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:09 PM2022-09-29T18:09:55+5:302022-09-29T18:10:14+5:30
या आश्चर्यजनक घटनेनंतर माने कुटुंबियासह गावातील नागरिकही अचंबित
अनिल पाटील
सरुड : अनेक वेळा म्हशीने तसेच गायीने एकाच दिवशी एका किंवा थोड्या वेळाच्या अंतराने दोन जुळ्या रेडकांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असाल. परंतू शाहूवाडी तालुक्यातील ठमकेवाडी येथील एका म्हशीने पहिल्या रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या रेड्याला जन्म दिल्याची आश्चर्यजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. या आश्चर्यजनक घटनेनंतर माने कुटुंबियासह गावातील नागरिकही अचंबित झालेत.
ठमकेवाडी येथील शहाजी माने यांच्या मालकीच्या म्हशीने गेल्या सोमवारी पहाटे एका रेड्याला जन्म दिला. त्यानंतर तीन दिवस या म्हशीने विनातक्रार दुधही दिले. गुरुवारी सकाळी दुध काढल्यानंतर काही वेळाने पुन्हा दुसऱ्या रेड्याला जन्म दिला. माने जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस म्हशीच्या विण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक झाली आहे. पहिल्या रेड्या प्रमाणेच दुसरा रेडाही शरीराने पुर्ण वाढ झालेला आहे. तसेच म्हैसही सुरक्षित आहे.
यापूर्वी म्हशीने किंवा गायीने एकाच दिवसात जुळ्यांना जन्म देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतू पहिल्या रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसाच्या अंतराने पुन्हा रेड्याला जन्म दिल्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
काही वेळा गर्भाशयाच्या दोन शिंगांत दोन वेगवेगळी अंडी फलित होतात. एकाची वाढ उजव्या शिंगात तर दुसऱ्याची वाढ डाव्या शिंगात होते. दोन्ही गर्भाचे आयुष्यमान वेगवेगळे असल्याने अशा म्हशी पासुन जन्म होणाऱ्या रेड्याच्या जन्मामध्येही अंतर पडू शकते. ही घटना अत्यंत दुर्मिळ असून प्रामुख्याने अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात. - डॉ . बी. एल. किटे, सहा. व्यवस्थापक (पशुसंवर्धन) गोकुळ दूध संघ