तब्बल २३ वर्षांनंतर... डॉ.प्रकाश शहापूरकर पुन्हा गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 05:44 PM2022-11-10T17:44:16+5:302022-11-10T17:49:01+5:30
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचा राजकीय वनवास अखेर संपला.
राम मगदूम
गडहिंग्लज( जि.कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचा राजकीय वनवास अखेर संपला. तब्बल २३ वर्षांनंतर ते पुन्हा कारखान्याच्या सत्तेत आले आहेत. एव्हाना, त्यांनाच अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण यांना बसविण्याची घोषणा माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू शेतकरी आघाडीच्या घोषणेवेळीच केल्याने केवळ 'सोपस्कार'च बाकी आहेत. नोव्हेंबरअखेरीस या निवडी होतील.
१९८०च्या दशकात आप्पासाहेब नलवडे व सहकाऱ्यांनी हरळीच्या फोंडया माळावर कारखान्याची उभारणी केली.त्यात डॉ. शहापूरकर यांचे वडील काकासाहेब यांनीही मोलाचे योगदान दिले,पुढे त्यांनीही काही काळ कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले.
दरम्यान,१९८८ मध्ये संस्थापक नलवडे यांच्या विरोधातील शिंदे- कुपेकर- हत्तरकी-कुराडे यांच्या आघाडीने ऐतिहासिक सत्तांतर घडवले.त्यानंतर डॉ.शहापूरकर यांचे जेष्ठ बंधू डॉ. शरदचंद्र यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला होता. १९९५ मध्ये बाबासाहेब कुपेकर व नलवडे यांच्या आघाडीतून शहापूरकर हे पहिल्यांदाच निवडून आले.त्यांनाही कुपेकरांनी अध्यक्षपदाची संधी दिली होती.दरम्यान, कुपेकरांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.
२००० मध्ये कुपेकरांनी शिंदेशी आघाडी केल्यामुळे शहापूरकरांना स्वतंत्र लढावे लागले.त्यानंतर त्यांनी ३ वेळा एकाकी तर गेल्यावेळी प्रकाश चव्हाण यांच्या सोबतीने निकराची लढाई केली.परंतु, नियतीने त्यांना साथ दिली नव्हती. दरम्यान, राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आली असतानाही त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी 'दोस्ती'करून 'चतुराई'ने कारखान्याची सुत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली आहेत. किंबहुना, त्यांच्या रूपाने आघाडीला आश्वासक चेहरा मिळाल्यामुळेच मुश्रीफांच्या नेतृत्वाखालील शाहू शेतकरी आघाडीला एकहाती सत्ता मिळाली आहे.
# ठळक नोंदी
* डॉ.प्रकाश शहापूरकर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि कुशल प्रशासक आहेत.
*१९९३ पासून सलग २९ वर्षे संचालक,५ वर्षे अध्यक्षपद भूषविले.
* काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना,जनसुराज्य, राष्ट्रवादीनंतर सध्या भाजपमध्ये आहेत.
* एकेकाळी 'गडहिंग्लज'चे पर्यायी राजकीय नेतृत्व.परंतु,केवळ स्वभावामुळेच बाजूला पडले होते.मुश्रीफांच्या पाठबळामुळेच ते यावेळी पुन्हा सत्तेत आले आहेत.
* अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ऊस वाहतुकीसाठी कारखान्याच्या खर्चाने सव्वा कोटीचा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा 'हरळी - इंचनाळ दरम्यान' बांधला आणि सवलतीच्या दरातून कारखान्याच्या पाणीपट्टीचे कोट्यवधी रुपये वाचवले.
* ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या अर्थसहाय्यातून दाभेवाडी येथे सहकारी उपसा जलसिंचन योजना राबवली.
* ऊसतोडणीसाठी स्थानिक टोळ्या तयार करून तोडणी वाहतुकीपोटी दरवर्षी तालुक्याबाहेर जाणारे कारखान्याचे कोट्यवधी रुपये कार्यक्षेत्रातील मजुरांना मिळवून दिले होते.
*शेतकऱ्यांना विहीर दुरुस्ती व पाईप लाईनसाठी त्यांनी अल्प व्याजदराने कर्ज मिळवून दिले होते.
*संस्थापक संचालकांचा वारसा कृतीतून जपणारे डॉ.प्रकाश शहापूरकर हेच कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देतील अशी अपेक्षा कारखान्याचे अल्पभूधारक सभासद,शेतकरी व कामगारांना आहे,म्हणूनच सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भावाच्या मृत्यूचे शल्य कायम !
६ जून,१९९० रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत जेष्ठ बंधू डॉ.शरदचंद्र शहापूरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीतच दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे कारखान्यातील राजकारणातूनच त्यांचा बळी गेल्याचे 'शल्य' डॉ.शहापूरकरांच्या मनात अजूनही कायम आहे.