दिलगिरीनंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By admin | Published: June 12, 2015 12:53 AM2015-06-12T00:53:58+5:302015-06-12T00:54:29+5:30
परीक्षा नियंत्रकांकडून अपशब्द प्रकरण : प्रभारी कुलगुरूंचा पुढाकार
कोल्हापूर : परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले. याबाबत प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी परीक्षा नियंत्रक काकडे व सेवक संघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. संगणक केंद्राच्या प्रभारी संचालिका स्वाती खराडे यांना अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी परीक्षा नियंत्रक काकडे यांचा कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १०) द्वारसभा घेऊन निषेध केला. परीक्षा नियंत्रकांनी माफी मागेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सेवक संघाने केला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. तत्पूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे यांनी सेवक संघाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. त्यावर ठिय्या आंदोलन स्थगित करून शिष्टमंडळ सकाळी सव्वाअकरा वाजता कुलगुरूंच्या कक्षात गेले. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी परीक्षा नियंत्रक आणि ग्रंथपाल यांचे वर्तन आणि त्यांच्या बोलण्याबाबतच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी डॉ. भोईटे यांना सांगितल्या. शिवाय संगणक केंद्राच्या प्रभारी संचालिका खराडे यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत परीक्षा नियंत्रकांनी माफी मागावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर डॉ. भोईटे यांनी परीक्षा नियंत्रक काकडे यांना बोलावून घेऊन त्यांच्याशीदेखील चर्चा केली. शिवाय, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांबाबत काही तक्रारी असल्यास संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांच्याशी पहिल्यांदा चर्चा करावी. शिवाय, अधिकाऱ्यांनीदेखील कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असल्यास प्रशासन आणि संघाच्या अध्यक्षांशी चर्चा करावी, अशी सूचना डॉ. भोईटे यांनी दिली. त्यानंतर परीक्षा नियंत्रक काकडे यांनी बुधवारी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त केल्यामुळे सेवक संघ आंदोलन मागे घेत असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. संघाच्या शिष्टमंडळात चिटणीस किशोर सासने, अतुल ऐतावडेकर, खजानीस सुरेश पाटील, संभाजीराव जगदाळे, मिलिंद भोसले, आदींचा समावेश होता. दरम्यान, बैठकीनंतर सेवक संघाने द्वारसभा घेऊन प्रभारी कुलगुरूंसमवेत झालेल्या चर्चेची माहिती कर्मचाऱ्यांना दिली.