मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
By admin | Published: July 24, 2014 12:22 AM2014-07-24T00:22:54+5:302014-07-24T00:30:38+5:30
पगाराची रक्कम अनुदानातून : गेले नऊ दिवस सुरू होता संप
इचलकरंजी : राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम शासकीय अनुदानातून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांचा गेले नऊ दिवस सुरू असलेला संप संपुष्टात आला.
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून नगरपालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने संप सुरू करण्यात आला होता. संपामध्ये राज्यातील सर्व २५७ नगरपालिका उतरल्याचा दावा संघटनेच्या वतीने केला होता. त्यानंतर १७ जुलैला नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मागण्यांसंदर्भात समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा झाली होती. या मागण्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ठेवून निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले होते. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक राहील, अशी ग्वाही देत राज्यमंत्र्यांनी संप मागे घेण्याचे आवाहनही केले होते; पण समन्वय समितीने संप पुढे सुरू ठेवला होता.
आज, बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण, राज्यमंत्री उदय सामंत, नगरपालिका प्रशासन संचालक पुरुषोत्तम भापकर यांची समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष सुभाष मोरे, भाऊसाहेब पाटील, कार्याध्यक्ष धनंजय पळसुले, राष्ट्रवादी कॉँग्रेस औद्योगिक सेलचे सरचिटणीस सुभाष मालपाणी, इचलकरंजीचे नगरसेवक रवी रजपुते, आदींबरोबर चर्चा झाली. सुमारे एक तास झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम शासकीय अनुदानातून अदा करण्यात येईल; तसेच रोजंदारी व हंगामी कामगारांना कायम करण्याविषयी शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्याचबरोबर अन्य मागण्यांचाही सहानुभूतीने विचार करू, असे आश्वासन दिले.
बैठकीनंतर समन्वय समितीचे अध्यक्ष घुगे व डॉ. कराड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप मागे घेण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)