जामीनानंतर ‘तोतया’ पोलीस पुन्हा जाळ्यात
By admin | Published: November 30, 2015 11:17 PM2015-11-30T23:17:41+5:302015-12-01T00:17:28+5:30
प्रभूला मालवणात जामीन : देवगड पोलिसांनी केली अटक
सावंतवाडी : शहरातील एका सायबर कॅफे चालकाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित पंकज रवींद्र प्रभू याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. मात्र त्याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने न्यायालयाचा जामीन होताच देवगड पोलिसांनी प्रभूला ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान, संशयिताला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या दोन महिला पोलीस अधिकार्यांना त्याने चकवा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडून देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले. सायंकाळी उशिरा अटक करून त्याची देवगडपोलीस ठाण्यात रवानगी केली.
मालवण येथील योगक्षेम ट्रेडर्सचे मालक योगेश पटकारे यांची १५०० रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. शुक्रवारी प्रभू याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
२९ नोव्हेंबर रोजी शिरगाव-देवगड येथील अजित चव्हाण यांनी रवींद्र प्रभू याने मार्च २०१४ साली आपली २ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रभू याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
देवगड पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एम. आर. पाटील हे प्रभू याला अटक करण्यासाठी फियार्दी चव्हाण यांच्यासह मालवण न्यायालयात हजर झाले. प्रभू याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर देवगड पोलिसांनी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मदतीने ताब्यात घेत अटक केली. त्यामुळे तोतया पोलीस पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
मालवण पोलीसात प्रभू याची आता भेट झाली असता माझे दोन लाख रुपये व व्याज उद्या फोन करून देतो असे सांगितल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. या साऱ्या प्रकारानंतर अन्य ठिकाणाहूनही प्रभू याच्या विरोधात तक्रारी नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
पंकज प्रभू याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणारे अजित चव्हाण यांनी प्रभू याने आपल्याला २ लाखाला फसवले. तर कोल्हापूर येथील एका व्यक्तीला दीड लाख, रत्नागिरी येथील एकाला ४० हजार, तर ठाणे येथील एका बड्या इसमाला दीड करोड रुपयाचा चुना लावला असल्याचे सांगितले आहे.