शिवसेनेच्या आंदोलनात म्हैस उधळल्याने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:50 AM2018-06-15T00:50:34+5:302018-06-15T00:50:34+5:30
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्राधान्य कुटुंब गट लाभार्थ्यांना मिळणारे १ किलो गहू कमी करून त्याऐवजी मका देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्राधान्य कुटुंब गट लाभार्थ्यांना मिळणारे १ किलो गहू कमी करून त्याऐवजी मका देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माणसांची तुलना जनावरांत केली जाणार असून त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शिवसेनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हैस आणून तिला मका देण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलकांमुळे भेदरलेली म्हैस उधळली आणि कार्यकर्ते, नागरिकांसह पोलिसांची एकच त्रेधातिरपीट उडाली.
शासनाच्या दि. ४ आॅक्टोबर २०१७ रोजी निघालेल्या नवीन परिपत्रकानुसार प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना ३ किलो गहूऐवजी १ किलो मका व २ किलो गहू देण्यात येणार आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हैस आणून तिला मका खायला दिला नंतर पक्षाचे पदाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यासाठी गेले. भेदरलेली म्हैस लहान प्रवेशद्वारातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नेण्याचा प्रयत्न केला. अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे म्हैस उधळली आणि तिने पार्किंगमधील दुचाकी पाडल्या. अखेर म्हशीच्या मालकाने तिला प्रवेशद्वाराबाहेर आणले व तिला शांत करण्यासाठी कोंडा खायला दिला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, शुभांगी पोवार आदी उपस्थित होते.