‘चिकोत्रा’नंतर वेदगंगा नदी कोरडीठाक
By Admin | Published: December 28, 2015 12:11 AM2015-12-28T00:11:17+5:302015-12-28T00:23:16+5:30
आठवडाभरापासून कोरडीच : शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न होणार गंभीर; शेतकरी चिंतेत
दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात वेदगंगा नदी पूर्णत: कोरडी पडली आहे, तर दूधगंगा नदीतही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या वेदगंगेसह दूधगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. भविष्यातही हीच परिस्थिती राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थ धास्तावले आहेत. यंदा कमी पावसामुळे काळम्मावाडी धरणामध्ये अवघा १९ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. डिसेंबरपर्यंत यातील साधारण ७ टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यामुळे धरणात सध्या केवळ १२.६४ टी.एम.सी. इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी जूनअखेरीस शेतीसह पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी देऊनही ७ टी.एम.सी. इतके पाणी शिल्लक राहिले होते.
चिकोत्रा धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे चिकोत्रा नदी प्रत्येक महिन्यात १५ ते २0 दिवस कोरडीच असते, तर आता वेदगंगा नदीही चिकोत्राच्याच वाटेवर जात असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांतून व्यक्त होत आहेत. १९९५ मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री सदाशिवराव मंडलिक यांनी नाल्यातून वेदगंगा नदीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वेदगंगा व दूधगंगा नद्या जोडल्या गेल्या. किंबहुना यामुळे वेदगंगा नदीकाठावरील निढोरी, कुरुकली, सुरुपली, मुरगूड, भडगाव, कुरणी, चौंडाळे, मळगे, बानगे, आणुर, बस्तवडे, म्हाकवे, कौलगे, नानीबाई चिखली यासह सीमाभागातील गावातील कृषिक्रांतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला. मात्र, यावर्षी पाऊस अपुरा पडल्याने काळम्मावाडी धरण केवळ २१ टीएमसीपर्यंत भरले. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी, शहरासह, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीकाठावरील गावांची तहान भागविण्यासह असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. यासाठी खबरदारी घेत जादा पाणी लागणारी ऊस, केळी, यासारख्या पिकांची लावणी करू नये. यासह ग्रामस्थांनी पिण्याचे पाणीही वाया जाऊ न देता काटकसरीने वापरावे, अशा नोटीस दिल्या आहेत. मात्र, याकडे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी दुर्लक्ष करीत आपल्याला पाणी कमी पडणार नाही असे समजून उसासह केळीच्याही लावणी केल्या आहेत.
पाण्याची दाहकता
२७ टी.एम.सी. पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या काळम्मावाडी धरणात गतवर्षी २५.४0 टी.एम.सी. पाणी सोडले होते. त्यातील वर्षभर पिण्यासह शेतीसाठी पाणी देऊन ७ टी.एम.सी.हून अधिक पाणी शिल्लक होत. यावर्षी केवळ १२ टी.एम.सी. इतक्याच पाण्याची भर पडली, तर पावसाचा हंगाम असणाऱ्या ऐन आॅक्टोबर महिन्यासाठी नदी कालव्यांना पाणी सोडावे लागते. त्यामुळे २३ डिसेंबर रोजी या धरणातील पाणीसाठा १२.६४ टी.एम.सी. इतकाच राहिला आहे. त्यामुळे अद्याप सहा महिने या तुटपुंज्या ५0 टक्के पाणीसाठ्यावर ढकलावी लागणार आहेत.
टंचाई काळात पाटगावचे पाणी वेदगंगेत सोडावे
पाटगांव धरण हे वेदगंगा नदीवर बांधण्यात आले आहे; मात्र या धरणाचे पाणलोट क्षेत्र फारच कमी आहे. या धरणातील पाणी केवळ वाघापूर जवळील बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात येते, तर त्या पुढील गावांना काळम्मावाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे किमान टंचाईच्या काळात तरी पाटगांवचे पाणी वाघापूर बंधाऱ्यातून खाली सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांतून होत आहे.