पुरात पोहत जाऊन कोपार्डेत पाणीपुरवठा केला सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:13 AM2018-07-25T00:13:14+5:302018-07-25T00:13:24+5:30
कोपार्डे : गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून धो-धो पडणाऱ्या पावसामुळे कुंभी नदीवर असणाºया कोपार्डे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा केंद्राला विद्युतपुरवठा करणाºया ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने बंद होता. हा बिघाड काढण्याचा एक प्रयत्न असफल झाला; पण ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन महावितरणचे कर्मचारी सतीश भवड यांनी ग्रामपंचायत कर्मचाºयांना साथीला घेऊन अर्धा कि.मी. वाहत्या पाण्यात पोहत जाऊन हा बिघाड दुरुस्त केला.
म्हाताºया पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कुंभी नदीला मोठा पूर आला आहे. कोपार्डे गावाला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल नदीच्या अगदी काठावर आहे, तर याला विद्युतपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मरही येथे जवळच आहे. संततधार पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने हा ट्रान्स्फॉर्मरही पाण्याखाली गेला आणि शॉर्टसर्किट झाल्याने जॅकवेलला होणारा विद्युतपुरवठा खंडित झाला. ट्रान्स्फॉर्मर जेथे आहे तेथे जोरदार पाण्याचा प्रवाह होता. त्यातच धो-धो पाऊस यामुळे ग्रामपंचायतीने विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थेकडून बोट मागविली; पण ती मधे गेल्यानंतर बंद पडली आणि बाका प्रसंग निर्माण झाला. धाडसाने महावितरणचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाहेर आले; पण ग्रामस्थांची पाण्याची वणवण पाहून सरपंच रूपाली पाटील, उपसरपंच व्ही. जी. पाटील व सदस्य श्रीधर पाटील, धनाजी पाटील, दत्तात्रय पाटील यांनी महावितरणच्या कर्मचाºयांना पुन्हा दोन दिवसांनी बिघाड काढण्यासाठी विनंती केली. वायरमन सतीश भवड यांनी ग्रामपंचायत कर्मचाºयांना बरोबर घेऊन ट्रान्स्फार्मरवरील बिघाड काढला; पण जॅकवेलमध्ये असणाºया विद्युतमोटारीत बिघाड झाला. जॅकवेलपर्यंत पोहोचणे कठीण होते; पण सतीश भवड यांनी दोराला बांधून स्वत:ला पाण्यात झोकून दिले व जॅकवेलमधील बिघाडही काढला. यामुळे आठ दिवसांनंतर कोपार्डेतील पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला असून, पावसाळ्यात पाणीटंचाईतून कोपार्डेकरांची सुटका झाली.
ग्रामस्थांतून महावितरणचे कर्मचारी सतीश भवड, ग्रामसेवक बी. के. आंबेकर, कर्मचारी विष्णू पाटील, सरदार पाटील, दीपक कांबळे, संजय पाटील यांचे कौतुक होत आहे.