पराभवानंतर शिवसेनेत अस्वस्थता
By admin | Published: November 9, 2015 12:29 AM2015-11-09T00:29:01+5:302015-11-09T00:29:18+5:30
महापालिकेचे राजकारण : आमदार क्षीरसागर विरोधकांना उकळ्या
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेत्यांवर थेट आगपाखड करू लागल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षसंघटनेवर होणार हे निश्चित आहे. निवडणुकीतील अपयशाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधकांना चांगल्याच उकळ्या फुटल्या असून, त्यांनी ‘मातोश्री’पर्यंत योग्य तो संदेश पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेच्या दृष्टीने महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. गेले दहा वर्षे शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून येतो, पण महापालिकेवर सत्ता का मिळत नाही? असा प्रश्न शिवसैनिकांसह पक्षाच्या वरिष्ठांना पडत होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेतील आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही कामाला लावले होते. गेले सहा महिने महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने येथे भगव्या सप्ताहासारखे कार्यक्रम घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात वातावरणनिर्मिती करण्यात ते सगळ्यात पुढे होते; पण उमेदवार निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफुस सुरू झाली. केवळ इलेक्टिव्ह मेरिट हे कारण पुढे करत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनीच बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा फटका बसला. उमेदवारी देताना झालेले साटे-लोटे व बंडखोरी पाहता पक्षाला फारसे यश मिळणार नाही, हे निश्चित होते. प्रमुख विरोधी पक्षांनी तर शिवसेनेला प्रतिस्पर्धीच मानले नसल्याने त्यांच्यावर टीका करून आपली ताकदही वाया घालविली नाही. अपेक्षेप्रमाणे पक्षाला फक्त चार जागा मिळाल्या, त्याही स्वत:च्या ताकदीवरच आल्या. गेले सहा वर्षे शहरात शिवसेनेचे आमदार असताना पक्षाची वाताहत होतेच कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणुकीत नेत्यांनी खेळलेल्या अंतर्गत खेळ्या, त्याचा निकालावर झालेला परिणाम याचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींनी मागविला आहे. दुसऱ्या फळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी थेट राजीनाम्याची मागणी केल्याने आगामी काळात पक्षसंघटना टिकविणे नेत्यांसमोर आव्हान आहे.
कोल्हापूरकरांनी लाटेतही सहा आमदार दिल्याने मंत्रिपदाची संधी आहे. मंत्रिपदासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये क्षीरसागर यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना किंगमेकर ठरली असती तर आमदार क्षीरसागर यांच्यादृष्टीने जमेची बाजू ठरली असती; पण नामुष्कीजनक पराभवामुळे श्रेष्ठींच्या दरबारी त्यांचे वजन काहीसे कमी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरला संधी मिळालीच तर क्षीरसागर यांचे स्पर्धक वाढणार आहेत. आमदार नरके यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांचे शिवसेनेतील नेत्यांशी जुने संबंध आहेत. त्यांच्यामार्फत त्यांनी यंत्रणा कार्यरत केली आहे. आमदार मिणचेकर यांच्यासाठी एक बडा उद्योगपती प्रयत्नशील आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली तर ती कोणाला? हे जरी खरे असले तरी या संधी मागे पालिकेचे राजकारण असणार हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)
‘सोयीच्या राजकारणा’ने वजाबाकी
शिवसेनेने ओढून-ताणून ८१ उमेदवार उभे केले होते; पण उमेदवारी देताना त्यांनी अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीतील उपकाराची परतफेड केल्याचे स्पष्ट दिसते. ‘सोयीचे राजकारण’ करण्यात नेते यशस्वी ठरले; पण पक्षात मात्र वजाबाकीच झाल्याची चर्चा सुरू आहे.