बीडीओंच्या शिष्टाईनंतर खिद्रापूरमधील आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:56+5:302020-12-12T04:39:56+5:30
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायत ग्रामसेवक एम. एल. अकिवाटे यांना रजेवर पाठवून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आश्वासन ...
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायत ग्रामसेवक एम. एल. अकिवाटे यांना रजेवर पाठवून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी दिल्यानंतर गेले दोन दिवस सुरू असलेले ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे घेतले. ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत शिष्टाई केली.
ग्रामसेवक अकिवाटे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. मनमानी कारभार करत असल्याने गावच्या विकासाला खीळ बसत असून त्यांची बदली करावी, यासाठी उपसरपंच ललिता काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी बुधवार(दि. ९)पासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा दुसरा दिवस संपला तरी निर्णय घेणारे सक्षम अधिकारी न आल्याने आंदोलकांबरोबर ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत होता.
दरम्यान, शिरोळ पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, माजी आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील आदी प्रमुख लोकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गटविकास अधिकारी कवितके यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढली. त्यामध्ये ग्रामसेवक अकिवाटे यांना रजेवर पाठवून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामसेवक एस. बी. धुपदाळे यांच्याकडे पदभार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पं. स. उपसभापती सचिन शिंदे, ‘दत्त’चे संचालक संजय पाटील, पं. स. सदस्या दीपाली परीट, गीता पाटील, जयश्री पाटील, मियाखान मोकाशी, निर्मला मांजरे, विजय रायनाडे उपस्थित होते.
फोटो - १११२२०२०-जेएवाय-०५
फोटो ओळ - खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी आंदोलकांना मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले.