चर्चेनंतर आजऱ्यातील पेच सुटला

By admin | Published: January 24, 2017 12:27 AM2017-01-24T00:27:56+5:302017-01-24T00:27:56+5:30

भाजपला एक जागा : हाळवणकर यांची शिष्टाई; चराटी यांच्या उपस्थितीत निघाला तोडगा

After the discussion, the agony of the ailment was resolved | चर्चेनंतर आजऱ्यातील पेच सुटला

चर्चेनंतर आजऱ्यातील पेच सुटला

Next

कोल्हापूर : आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातील दोनपैकी एक पंचायत समितीची जागा भाजपला देण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी आणि आजरा भाजपशी समोरासमोर चर्चा करून हा तोडगा काढल्याने आजऱ्यात निर्माण झालेला पेच सुटेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. सोमवारी दुपारी कागलजवळ झालेल्या एका बैठकीत हा तोडगा काढण्यात आला.
आजरा साखर कारखान्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजरा तालुका महाआघाडी स्थापन झाली. अशोक चराटी, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी या महाआघाडीचे नेतृत्व करत आजरा साखर कारखान्याची सत्ता मिळविली. भाजपचेही दोन संचालक निवडून आले. मात्र, आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ ‘इतर मागास’साठी आरक्षित झाल्यानंतर चराटी यांनी ‘इतर मागास’चा दाखला काढल्याने भाजपचे नेते, कार्यकर्ते दुखावले. आजरा जिल्हा परिषद, आजरा पंचायत समिती आणि पेरणोली पंचायत समिती या तिन्ही जागा ताराराणी आघाडीला देण्याबाबतचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर मात्र कधी नव्हे ते भाजपचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ताराराणी आघाडीच्या मेळाव्याला जाण्याचे टाळले. त्यामुळे ताराराणी आघाडी आणि भाजपमध्ये आजरा तालुक्यात मतभेद असल्याचे वातावरण तयार झाले. त्याची दखल घेत या सर्वांना हाळवणकर यांनी रविवारी रात्री निरोप देऊन सकाळी बोलावून घेतले. आम्ही एकीकडे जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी एक-एक माणूस गोळा करताना तुम्ही अशी भूमिका घेऊ नका, असे सांगितले. मात्र, तीनपैकी किमान एकतरी जागा भाजपकडे हवी, अशी ठाम भूमिका या बैठकीत आजरा भाजपने मांडल्याचे कळते. त्यानंतर मग तातडीने चराटी यांना बोलावून घेण्यात आले. समोरासमोर चर्चा होऊन अखेर पंचायत समितीची एक जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे आजरा तालुकाध्यक्ष अरुण देसाई, बापू टोपले, आजरा साखर कारखान्याचे संचालक जितू टोपले, मलिक बुरूड, प्रा. सुधीर मुंज, दयानंद भुसारी यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)


महादेव पाटील-धामणेकर भाजपच्या संपर्कात
आजरा पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पाटील-धामणेकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. रविवारी त्यांनी कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. उत्तूर विभागात भाजपचे काम करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.

Web Title: After the discussion, the agony of the ailment was resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.