अविश्वास दिवाळीनंतर

By admin | Published: November 2, 2015 12:20 AM2015-11-02T00:20:17+5:302015-11-02T00:34:19+5:30

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीतील निर्णय

After the Diwali distrust | अविश्वास दिवाळीनंतर

अविश्वास दिवाळीनंतर

Next

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावरील अविश्वास ठराव दीपावलीनंतर दाखल करण्याचा आणि दरम्यान भुयारी गटार योजना, झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाची घरकुले, आयजीएम दवाखान्याचे हस्तांतरण, काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी अशा महत्त्वपूर्ण विषयांवर पालिकेची विशेष सभा आयोजित करण्याचा निर्णय येथील कॉँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे व कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांची उपस्थिती होती.
कॉँग्रेस पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या या बंडाला शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. याला दहा महिने उलटले. या कालावधीत नगराध्यक्षा बिरंजे यांना सहकार्य करूनही त्या शहर विकास आघाडीच्याच नगरसेवकांचे ऐकतात. कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगराध्यक्षांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही.
उलट शहर विकास आघाडीकडून अडचणी निर्माण केल्या जातात. नगराध्यक्षांकडून कॉँग्रेस नगरसेवक-नगरसेविकांना सापत्न वागणूक मिळते. अशा प्रकारचा पाढा शनिवारी झालेल्या कॉँग्रेस समितीतील बैठकीत वाचण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर रविवारी माजी मंत्री आवाडे, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष मोरे व माजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉँग्रेस नगरसेवक-नगरसेविकांची सुमारे पावणे दोन तास बैठक झाली. बैठकीमध्ये या सर्वांसमोर नगरसेवक-नगरसेविकांनी कालच्याच बैठकीतील सापत्न वागणुकीचा पाढा वाचला. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींकडून नगराध्यक्षांच्या बाबतीत कडक कारवाई करण्यासाठी काही नगरसेवक-नगरसेविकांनी आग्रह धरला. त्यानंतर बोलताना आवाडे यांनी, नगराध्यक्षांवरील अविश्वासाबाबत दीपावलीनंतर नगरसेवकांची खास बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ, असे सांगितले.
दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत जयभीम व नेहरूनगर याठिकाणी काही घरकुलांच्या इमारती तयार आहेत. त्या ताब्यात घेऊन त्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्याबरोबरच या योजनेचे अनुदान केव्हा मिळणार, भुयारी गटार व काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणण्याच्या योजनांचा समावेश आता ‘अमृत’ योजनेमध्ये झाला आहे.
त्याबाबतच्या अनुदानाची माहिती पालिका सभागृहास समजली पाहिजे. तसेच पालिकेच्या आयजीएम दवाखान्याचे शासनाकडे होणारे हस्तांतरण अशा विषयांवर नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलवाव्यात, यासाठी त्यांना नगरसेवकांची पत्रे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)
तिघे अनुपस्थित, तर एका नगरसेविकेला उशीर
रविवारच्या कॉँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीला संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके व रेखा रजपुते अनुपस्थित होते. त्यापैकी रेखा रजपुते या नातेवाइकांच्या दु:खद कारणामुळे उपस्थित नव्हत्या, तर सुनीता मोरबाळे या बैठकीस उशिरा आल्या, अशीही माहिती कॉँग्रेस सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: After the Diwali distrust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.