दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:37 AM2017-11-02T10:37:41+5:302017-11-02T10:53:26+5:30
दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या सर्व ८५० माध्यमिक शाळांची सुरुवात बुधवारपासून झाली. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. खासगी प्राथमिक, महानगरपालिकेच्या शाळा या आज, गुरुवारपासून भरणार आहेत.
कोल्हापूर ,दि. ०२ : दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांची सुरुवात बुधवारपासून झाली. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. खासगी प्राथमिक, महानगरपालिकेच्या शाळा या आज, गुरुवारपासून भरणार आहेत.
यावर्षी दिवाळीच्या सुटीची सुरुवात दि. १६ आॅक्टोबरपासून झाली. ही सुटी संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या दोन हजार प्राथमिक शाळा या ३० आॅक्टोबरपासून सुरू झाल्या. जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या ८५० माध्यमिक शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांच्या गर्दीने या शाळांचा परिसर गजबजून गेला.
शहरात खासगी प्राथमिक आणि महानगरपालिकेच्या एकूण १५० शाळा आहेत. त्या आज, गुरुवारपासून भरणार आहेत. संकलित मूल्यपान चाचणी (एक) दि. ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याची तयारी, अभ्यासाची लगबग आता शाळांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, इयत्ता पहिली व दुसरीच्या मराठी व गणित, तिसरी ते पाचवीच्या मराठी, गणित, इंग्रजी आणि सहावी ते आठवीच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका शासनाकडून दिल्या जातात. यावर्षी शासनाने संबंधित विषयांच्या परीक्षा दिवाळीच्या सुटीनंतर, तर समाजशास्त्र, हिंदी अशा अन्य विषयांची परीक्षा शाळांनी आपआपल्या पातळीवर नियोजन करून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार अनेक शाळांमध्ये परीक्षेच्या तयारीची बुधवारपासून सुरूवात झाली.
पुन्हा घ्यावी लागणार परीक्षा
शासनाच्या सूचनेला बगल देऊन काही शाळांनी मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाची परीक्षा या दिवाळीची सुटी सुरू होण्यापूर्वी घेतल्या आहेत. शासनाकडून प्रश्नपत्रिका मिळालेल्या नसून देखील त्यांनी या विषयांच्या परीक्षा घेतल्या आहे. मात्र, आता शासनाकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या असल्याने अशा शाळांना संबंधित विषयाच्या परीक्षा पुन्हा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त ताण पडणार आहे.