डॉक्टरांच्या लेखी मागणीनंतर औषध द्या

By admin | Published: March 17, 2015 11:21 PM2015-03-17T23:21:25+5:302015-03-18T00:06:28+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी निर्णय

After the doctor's written request, give the medicine | डॉक्टरांच्या लेखी मागणीनंतर औषध द्या

डॉक्टरांच्या लेखी मागणीनंतर औषध द्या

Next

सांगली : जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या लेखी मागणी पत्रानुसारच औषध पुरवठा करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्याकरिता गठित केलेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या बैठकीस जिल्हा सरकारी वकील चंद्रकांत माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, पोलीस निरीक्षक अशोक भवड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी, समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, डॉ. राहुल मोरे, सुरेश भोसले, दुष्यंत माने, डॉ. संजीवकुमार वाटेगावकर आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यामधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करावी. यानुसार डॉक्टरांचे लेखी मागणीपत्र घेऊनच औषध पुरवठा करण्यात यावा. या कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. डॉक्टरांना औषध पुरवठा करताना डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता आदी बाबींची खात्री करूनच औषध विक्री करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याचे औषध निरीक्षक व्ही. व्ही. नांगरे यांनी सांगितले.
बोगस डॉक्टरांची लोकांना माहिती व्हावी म्हणून प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत बोगस डॉक्टरांविषयी स्वतंत्र विषय घेऊन ग्रामसभेत चर्चा घडवून आणावी. याकामी आरोग्य विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या दवाखान्याच्या फलकांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचना ठळकपणे प्रसिद्ध करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

पंचकर्म उपचार केंद्रांचा सर्व्हे करणार
बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करण्याबरोबरच बोगस डॉक्टरांची माहिती देणाऱ्यांसाठी तसेच बोगस डॉक्टरांच्या शिक्षणाविषयी माहिती देणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्याची सूचनाही करण्यात आली. आयुर्वेदिक पंचकर्म उपचार केंद्राच्या व्यावसायिकांचा सर्व्हे करावा, या सर्व्हेमध्ये बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: After the doctor's written request, give the medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.