वडिलानंतर मुलगाही आमदार.. कोल्हापूरकरांनी सहाजणांचे निवडले वारसदार
By पोपट केशव पवार | Published: October 23, 2024 04:02 PM2024-10-23T16:02:41+5:302024-10-23T16:06:55+5:30
कर्तृत्व पाहूनच लोकांनी दिली संधी
पोपट पवार
कोल्हापूर : राजकारणात एकाच घराण्याला जनता कधी स्वीकारते, तर अनेकदा ती स्वीकारत नाही, असे चित्र गेल्या साठ वर्षांत राज्यातील अनेक मतदारसंघांत दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मात्र एकाच घरात वडील व मुलालाही आमदारकीचा गुलाल अनेक मतदारसंघांनी लावला आहे.
जिल्ह्यातील बाप-लेकांच्या सहा जोड्यांना आमदारकी मिळाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, आनंदराव देसाई, बाबासाहेब पाटील-सरुडकर, जयवंतराव आवळे व नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्यानंतर त्यांच्या मुलांनाही जनतेने स्वीकारल्याचे दिसते.
सरुडकर पिता-पुत्रांना दिली संधी
शाहूवाडी मतदारसंघातून बाबसाहेब पाटील सरुडकर हे १९८० व १९९० असे दोन वेळा आमदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजित यांना येथील जनतेने २००४ व २०१४ मध्ये विधानसभेत जाण्याची संधी दिली.
डी. वाय. पाटील यांच्यानंतर सतेज पाटीलही विधानसभेत
पन्हाळा मतदारसंघातून डॉ. डी. वाय. पाटील हे १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सतेज पाटील यांनी २००४ मध्ये करवीरमधून अपक्ष उमेदवारी करत बाजी मारली. पुढे २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला.
हातकणंगलेत आवळे बापलेकांची किमया
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जयवंतराव आवळे तब्बल पाचवेळा विधानसभेत गेले आहेत. ते राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे यांनाही लोकांनी २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेत जाण्याची संधी दिली.
चंदगडमध्ये पाटील पिता-पुत्रांना गुलाल
चंदगडमध्ये १९९० मध्ये काँग्रेसकडून, तर २००४ मध्ये जनसुराज्यकडून नरसिंग गुरुनाथ पाटील विजयी झाले होते. त्यांच्यानंतर पाच टर्मनंतर त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत विजय मिळवला.
आवाडे पिता-पुत्र तीन वेळा विधानसभेत
जिल्ह्यातील मातब्बर आवाडे कुटुंबातील पिता-पुत्रांना इचलकरंजीकरांनी गुलाल लावला आहे. १९८० मध्ये कल्लाप्पण्णा आवाडे हे या इचलकरंजी मतदारसंघातून निवडून गेले होते. पुढे ते लोकसभेत गेल्याने येथील जनतेने त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे यांना १९८५, १९९५, १९९९, २००४ व २०१९ असे तब्बल पाचवेळा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी दिली.
देसाई घराण्यात बापलेकांना आमदारकी
राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून आनंदराव देसाई व बजरंग देसाई या बापलेकांना आमदारकी मिळाली आहे. १९६२ च्या पहिल्या निवडणुकीत भुदरगडमधून काँग्रेसकडून आनंदराव देसाई विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बजरंग देसाई देसाई हे १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विधानसभेत गेले.
पतीनंतर पत्नी आमदार
हातकणंगले मतदारसंघातून निवडून गेलेल्या बाबासाहेब खंजिरे यांच्यानंतर पुढे शिरोळ मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सरोजिनी खंजिरे या १९८५ मध्ये आमदार झाल्या. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात संध्यादेवी कुपेकर, संजयसिंह गायकवाड यांच्यानंतर संजीवनीदेवी गायकवाड, चंद्रकांत जाधव यांच्यानंतर जयश्री जाधव यांना आमदारकी मिळाली.