निवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:41 AM2019-05-16T11:41:47+5:302019-05-16T11:44:59+5:30
कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.
कोल्हापूर : शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.
शहरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आरटीओ कार्यालय, कसबा बावड्यातील भगवा चौक, राजर्षी शाहू जन्मस्थळ, भाजी मंडई, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्य कार्यालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, गंगावेश परिसर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसर, भवानी मंडप परिसरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.
शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणाने व्यापले आहेत. नागरिक व नगरसेवकांनी मागणी करूनही ठोस कारवाई होत नाही; त्यामुळे नागरिकांत रोष आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. या कारवाईस लोकप्रतिनिधी व नागरिक किती साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिकांनी फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा, आदी ठिकाणी अनधिकृतपणे व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत. अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत संबंधितांनी काढून घ्यावीत. महापालिकातर्फे शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू करणार असून, यामध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.
- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)
पोलीस प्रशासन सकारात्मक
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महापालिकेने मागणी न करतानाही अतिक्रमण कारवाईसाठी मदत म्हणून पोलिसांचे एक पथक कायमस्वरूपी देण्याची ग्वाही दिली आहे. पोलीस बंदोबस्त सहज उपलब्ध होणार असल्याने महापालिकेला कारवाई करणे सोपे होणार आहे. सर्वसमावेशक व सातत्य ठेवत महापालिकेने अतिक्रमणविरोधात धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.