Hasan Mushrif: राष्ट्रवादीचा मुरगूड पोलीस स्टेशन समोर सात तास ठिय्या, समरजित घाटगेंवर गुन्हा नोंद करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:14 PM2023-02-25T17:14:45+5:302023-02-25T17:23:59+5:30
समरजित घाटगे व भाजपच्या विरोधात निषेधाच्या घोषणा
अनिल पाटील
मुरगूड : सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार ही भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या सांगण्याने झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासह तक्रारदार विवेक कुलकर्णी व भाजपच्या अन्य सोळा कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवा या मागणीसाठी आज शनिवारी सकाळ पासून तब्बल सात तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी समरजित घाटगे व भाजपच्या विरोधात निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सायंकाळी चार वाजता तक्रारदार विवेक कुलकर्णी व अन्य सोळा कार्यकर्त्यांवर कलम ४२० व कलम ५०० प्रमाणे दोन गुन्हे दाखल झाले.
शुक्रवारी दुपारी विवेक कुलकर्णी यांनी अन्य सोळा कार्यकर्त्यांसह मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये हसन मुश्रीफ यांनी चाळीस कोटीची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. यावेळी पोलिसांनी घाईने आणि दबावाखाली मुश्रीफ यांच्यावर अगदी कमी वेळात गुन्हा नोंद केला होता. यामुळे कोणतीही चौकशी न करता पोलीस प्रशासनाने आमदार मुश्रीफ यांच्यावर गुन्हा नोंद कसा केला असा प्रश्न उपस्थित करत शुक्रवारी सांयकाळ सात पासून पोलीस स्टेशन च्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर पहाटे एकच्या सुमारास कुलकर्णी व अन्य सोळा जनावर कलम ५०० प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता.
कुलकर्णी यांचा बोलवता धनी समरजित घाटगेच
मुश्रीफ यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यामुळे जिल्हा बँक आणि मुश्रीफ कुटूंबियाची बदनामी झाली त्यामुळे तक्रारदार कुलकर्णी यांचा बोलवता धनी समरजित घाटगेच आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर हजारो कार्यकर्ते कारखान्याचे सभासद एकत्र जमू लागले होते. यावेळी जमा होणारी गर्दी लक्षात घेता स्टेशन च्या समोर मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी मोठी घोषणाबाजी झाली.
अनेक संतप्त कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट देऊन माहिती घेतली तर माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, गोकुळ संचालक युवराज पाटील, भैय्या माने, सतीश पाटील, अंबरीश घाटगे, मनोज फराकटे, देवानंद पाटील, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष विकास पाटील, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन समरजित घाटगे यांच्यावर गुन्हा नोंद करा अशी मागणी केली.
डी वाय एस पी संकेत गोसावी यांच्यासह सपोनि विकास बडवे, अन्य अधिकारी यांच्या बरोबर अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. शेवटी सायंकाळी चारच्या सुमारास तक्रारदार विवेक कुलकर्णी यांनी खोटी फिर्याद दिल्याचे सांगून कारखाना जिल्हा बँक आणि मुश्रीफ कुटूंबियाची बदनामी केल्याचा ठपका ठेवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. भैय्या माने प्रविणसिंह पाटील यांनी पोलीस स्टेशन समोर येऊन कार्यकर्त्यांना याची माहिती दिली आणि हे आंदोलन समाप्त झाल्याचे सांगितले.
हसन मुश्रीफ यांचा फोन वरून सवांद
आंदोलनाची सांगता करताना आमदार हसन मुश्रीफ यांनी फोन वरून कार्यकर्त्यांशी सवांद साधला. मावळ्यानो नमस्कार असे म्हणत आता रस्त्यावरील अशा लढाया आपल्याला कायम लढाव्या लागणार असल्याचे सांगून मी माझं संपूर्ण आयुष्य हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी अर्पण केल आहे. माझ्या प्रेमा पोटी आपण हजारो कार्यकर्त्यांनी तब्बल सात तास उपाशी पोटी आंदोलन केल्याने आपला विजय झाल्याचे त्यांनी सांगितले.