छाननीत दोन संचालकांचे अर्ज बाद
By admin | Published: March 2, 2016 01:24 AM2016-03-02T01:24:20+5:302016-03-02T01:25:27+5:30
गडहिंग्लज कारखाना निवडणूक : कामगाराचा अर्ज ठरला पात्र
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण समर्थक विद्यमान संचालक अॅड. विकास पाटील व भैरू पाटील-वाघराळकर या दोघांचेही उमेदवारी अर्ज छाननीत अपात्र, तर कामगार शशिकांत चोथे यांचा अर्ज पात्र ठरल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी मंगळवारी दिला.
जिल्हा बँकेचे थकबाकीदार असणाऱ्या निलजीच्या हिरण्यकेशी शेतीमाल फळे व भाजीपाला प्रक्रिया कारखान्याचे संचालक असणाऱ्या अॅड. पाटील आणि वाघराळकर-पाटील या दोघांचेही कारखान्याचे संचालकपद रद्द करण्याचा आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. त्याला स्थगिती मिळावी म्हणून दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, अद्याप स्थगिती न मिळाल्यामुळे मंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची हरकत माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी छाननीच्यावेळी घेतली होती.
अॅड. पाटील यांनी ‘कौलगे-कडगाव’ गटातून, तर वाघराळकर यांनी ‘महागाव-हरळी’ या गटातून उमेदवारी दाखल केली होती. माजी अध्यक्ष अॅड. शिंदे यांचे समर्थक चोथे यांनी ‘भडगाव-मुगळी’ गटातून अर्ज दाखल केला होता. छाननीच्यावेळी अॅड. शिदेंनी या दोन्ही पाटलांच्या उमेदवारीस, तर चव्हाण समर्थक सुभाष चोथेंनी शशिकांत चोथेंच्या उमेदवारीस हरकत घेतली होती. त्या संदर्भातील सुनावणीचा निकाल देण्यात आला.
शशिकांत चोथे यांनी नोकरीचा राजीनामा दिला असला तरी तो अद्याप मंजूर केला नसल्याने ते सद्य:स्थितीत संस्थेचे पगारदार नोकर असल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र करण्याची मागणी चोथेंनी केली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतरच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, संस्थेच्या नियमावलीत राजीनामा नामंजूर करण्याविषयीची तरतूद नसल्याने एकतर्फी दिलेला राजीनामा तत्काळ प्रभावाने अंमलात येतो, असा अभिप्राय नोंदवून त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. अॅड. शिंदे व चोथे यांच्यातर्फे अॅड. राहुल देसाई यांनी काम पाहिले. या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यानिमित्ताने गडहिंग्लज साखर कारखान्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले!
गतवेळी अॅड. पाटील यांनी काँगे्रसतर्फे, तर भैरू पाटील हे जनसुराज्यतर्फे निवडून आले होते. यावेळी देखील मातब्बर उमेदवार म्हणून सत्तारूढ गटात त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ‘अपात्र’तेच्या कारवाईमुळे आगामी निवडणुकीतील दोघांच्याही उमेदवारीवर गडांतर येण्याची शक्यता केवळ ‘लोकमत’नेच सर्वप्रथम १३ जानेवारी २०१६ च्या अंकातील बातमीत व्यक्त केली होती. दोघांचेही छाननीत अर्ज अवैध ठरल्यानंतर ‘लोकमत’च्या सडेतोड वृत्ताची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
‘अविश्वास’ अन् ‘विश्वास’!
दोन वर्षांपूर्वी कारखान्यात झालेल्या सत्तांतरावेळी माजी अध्यक्ष अॅड. शिंदेंच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विकास पाटील व भैरू पाटील यांनी उपाध्यक्ष चव्हाण यांना साथ दिली होती. त्याच रागापोटी शिंदेंनी उच्च न्यायालय आणि सहकारमंत्र्यांचा दरवाजा ठोठावून त्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश मिळविला. त्या आधारेच ते अपात्र ठरले. याउलट आयुष्यभर आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या शशिकांत चोथे या कामगाराची उमेद्वारी देण्यासाठी शिंदेंनी दाखल केली होती. त्यास चव्हाण समर्थक चोथेंनी हरकत घेतली होती. दोन्ही पाटलांना अपात्र आणि शशिकांतचा अर्ज पात्र ठरविण्याची शिंदेंची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननीच्या निकालात मान्य केली. त्यामुळे ‘अविश्वास’ अन् ‘विश्वासा’ची विशेष चर्चा झाली.