शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १५ ऑक्टोबरनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:23 PM2020-10-07T15:23:38+5:302020-10-07T15:25:44+5:30
Shivaji University, kolhapurnews, educationsector, online, exam शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने दि. १५ ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय विद्या परिषद घेणार आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने दि. १५ ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय विद्या परिषद घेणार आहे.
विद्यापीठाने दि. १० ऑक्टोबरपासून अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, लेखणी बंद आंदोलन आणि परीक्षा घेण्यासाठीच्या एजन्सी निवडीची प्रक्रिया लांबल्याने विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलावी लागली. एजन्सीची निवड झाल्याने आता परीक्षेच्या तयारीची गती वाढली आहे.
वेळापत्रक निश्चितीचे काम सुरू झाले आहे. परीक्षा घेण्याच्या संगणक प्रणालीमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच (एमसीक्यू) अपलोड करणे, आदींबाबत या एजन्सीकडून येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळातील कर्मचारी, परीक्षाविषयक काम करणारे प्राध्यापक आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार आहे. त्यांतील ५८४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याबाबतच्या पर्यायाची विद्यापीठाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. अद्याप १०६०० विद्यार्थ्यांनी पर्याय नोंदविलेला नाही. त्यांच्यासाठी पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारपर्यंत आहे. या मुदतीमध्ये जे विद्यार्थी पर्यायाची नोंद करणार नाहीत. त्यांना विद्यापीठ सांगेल त्या पर्यायानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
तीन सत्रांमध्ये होणार परीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाला दि. ३१ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला सुटी वगळता १० दिवसांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रोज सकाळी ११ ते दुपारी १२, दुपारी एक ते दोन आणि दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत परीक्षा होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी ओटीपी महत्त्वाचा
ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाकडे नोंद असलेल्या विद्यार्थ्याला ओटीपी पाठविण्यात येईल. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याची ओळख ठरणार आहे. त्याने ओटीपी टाकल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिसणार आहे.