पलायनानंतर लोकरेचा जंगलात आसरा

By admin | Published: March 3, 2015 09:26 PM2015-03-03T21:26:37+5:302015-03-03T21:56:52+5:30

धक्कादायक जबाब : सावंतवाडी कारागृहातील छप्पर दुरूस्तीवेळी रचला होता कट

After fleeing, the shelter in the Lokara forest | पलायनानंतर लोकरेचा जंगलात आसरा

पलायनानंतर लोकरेचा जंगलात आसरा

Next

अनंत जाधव -सावंतवाडी -एचडीएफसी बँकेची कॅश वाहतूक करणाऱ्या गाडीला उडवून देण्याचा कट रचणारा मास्टर मार्इंड ज्ञानेश्वर जगन्नाथ उर्फ माऊली लोकरे याने सावंतवाडी कारागृहात असताना कारागृह अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करीत कारागृहाच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि याचवेळी छपराच्या दोन फळ्या बाजूला करून पसार झाला, असे पोलिसांना दिलेल्या जबाबात लोकरे याने म्हटले आहे. यासाठी दोन सळ्यांचा उपयोग केला आणि पसार झाल्यानंतर तीन दिवस ट्रकच्या शोधात जंगलात लपून बसल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली. सावंतवाडी पोलिसांनी मंगळवारी ज्ञानेश्वर लोकरे याला बीड पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला. यात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आंबोली-नांगरतास धबधब्याजवळ एचडीएफसी बँकेच्या कॅश वाहतूक करणाऱ्या गाडीला बॉम्बद्वारे उडवून देण्याचा कट लोकरे याने रचला होता. या कटात त्याच्या नातेवाईकांसह अन्य तिघांनी मदत केली होती. घटनेनंतर एक महिन्याने सोलापूर पोलिसांच्या मदतीने त्याच्या मोहोळ (जि. सोलापूर) या गावातून त्याला अटक करण्यात आली होती.या गुन्ह्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुरू होती. त्यासाठी त्याला सावंतवाडीतील जिल्हा कारागृहात ठेवले होते. या कालावधीत त्याने कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे इमारतीच्या छप्पर दुरूस्तीचे काम दिले होते.कैद्यांसाठी जिथे जेवण तयार केले जाते, त्या स्वयंपाकगृहाच्या खोलीच्या छप्पर दुरुस्तीदरम्यान त्याने दोन फळ््या पळून जाता येईल, अशा रीतीने अलगद ठेवल्या होत्या. तत्पूर्वी पळून जाण्यासाठी लोकरे दोरी विणतो, याची माहिती तुरुंगातच पसरल्याने त्याने दोरी विणण्याचा मार्ग सोडून दिला. मात्र, त्याच्या अंथरूणाखाली दोरीचा लांबलचक पुडका अधिकाऱ्यांना मिळाला होता.सिंधुदुर्गमध्ये आलाच नाहीसावंतवाडी कारागृहातून पलायन केल्यानंतर पुन्हा कोकणात आलोच नाही. माझे सर्व गुन्हे सोलापूर, बीड, अहमदनगर आदी ठिकाणीच केले. येथे पोलीस कसून तपासणी करतात. आमच्याकडे एवढी चौकशी होत नाही, असा खुलासाही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.बीडमध्ये बँक फोडून पलायन करताना आष्टी तालुक्यात माझ्या सोबतच्या चौघांना पकडले. त्यांच्यापैकी एकाच्या मदतीने माझ्या मोबाईलवरून फोन करून मला बोलावून घेतले. त्यांना पकडल्याची माहिती मला नसल्याने मी बेसावध होतो. साथीदाराच्या फोनमुळे मी बीड येथे गेलो असताना तेथेच पोलिसांनी मला पकडल्याचे त्याने सांगितले.


पलायनानंतर तिसरे लग्न
पलायन केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच लोकरेने तिसरा विवाह केला. पण हा विवाह फार काळ टिकला नसल्याचे पोलीस जबाबात पुढे आले आहे. विवाहानंतरही चोरीचे धंदे सुरू ठेवल्याने पत्नी कंटाळून सोडून गेल्याचे त्याने सांगितले.


चहा घेतला...नाश्ता घेण्याआधीच फरार
ज्ञानेश्वर लोकरे याने १४ जानेवारी २०११ या दिवशी प्लॅनला दिशा दिली. तो पहाटे ५ वाजता उठला. सहा वाजण्याच्या सुमारास त्याने चहा घेतला. कारागृहात सकाळी साडेसहाच्या सुमारास नाष्टा दिला जातो. पण तो नाष्ट्याच्या ठिकाणी गेलाच नाही.
ठरल्याप्रमाणे जेवण खोलीत त्याने दोन मोठ्या सळ्या आणून ठेवल्या होत्या. त्यांच्या आधाराने आधीच ठेवलेल्या दोन फळ््या अलगद बाजूला करून तो चढून वर गेला.
छपराची भिंत व कारागृहाची संरक्षक भिंत यांच्यातील अंतर मोठे असल्याने त्याने एक सळी दोन्ही भिंतीवर आडवी टाकली व संरक्षक भिंतीवरून उडी ठोकून पळून गेला.


मोती तलावाच्या काठावरून चालत
सावंतवाडी कारागृहातून सकाळी साडेसहाच्या सुमारास पलायन केल्यानंतर लोकरे याने कारागृहाच्या भिंतीवरून बाजूला टाकलेल्या वाळूच्या ढिगावर उडी मारल्याने त्याला मोठी दुखापत झाली नाही.
त्यानंतर रस्त्याने मोती तलावाच्या काठावर येऊन तो ट्रकची वाट पाहत थांबला होता. तेथे कोणतीच वाहन न मिळाल्याने त्याने थेट एसटी बसस्थानक गाठले. तेथून चालतच आंबोलीच्या दिशेने गेला.
सापडण्याच्या भीतीने त्याने अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माडखोल जंगलाचा आसरा घेतला.
तब्बल तीन दिवस अन्न-पाण्याविना तो माडखोलच्या जंगलात थांबला होता. या काळात वेळोवेळी रस्त्यावर येऊन एखादे वाहन मिळते का ते तो बघत होता. अखेर पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रकच्या मागे बसून तो कोल्हापूरला गेला आणि तेथून त्याने आपले गाव मोहोळ गाठले.


पंढरपूर पोलिसांना खोटे
नाव सांगितल्याने बचावला
खातरजमा नाही : साप तस्करी प्रकरण
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहातून पलायन केल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच, म्हणजेच २०१२ मध्ये पंढरपूर येथील मित्राच्या मदतीने दुतोंड्या सापाची तस्करी करताना ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे याच्यासह तिघांना पंढरपूर पोलिसांनी पकडले होते. मात्र, लोकरे याने पोलिसांना राजू कृष्णा पवार असे खोटच नाव सांगितले होते. याबाबत पंढरपूर पोलिसांनी कोणतीही खातरजमा केली नव्हती, अशी माहिती सावंतवाडी पोलीसांनी दिलेल्या जबाबात पुढे आली आहे.
पंढरपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर मी सोलापूर येथील जिल्हा कारागृहातच होतो. न्यायालयात तीन महिन्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मी जामिनावर सुटलो, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After fleeing, the shelter in the Lokara forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.