महापुरानंतर भरपाईबरोबरच पंचनाम्यातही काटछाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:30 AM2021-08-18T04:30:03+5:302021-08-18T04:30:03+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
दत्ता पाटील
म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २०१९ पेक्षाही यंदा नुकसानीचे प्रमाण वाढले असताना शासनाकडून भरपाई मात्र तुटपुंजी दिली जात आहे. नुकसानीचे पंचनामे करतानाही अनेक शेतकऱ्यांचे त्यांच्या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले असताना अधिकारी ९० टक्क्यांपर्यंतच नुकसान झाल्याच्या नोंदी करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यंदाही २०१९प्रमाणेच भरपाई मिळावी, अशीही मागणी होत आहे.
वेदगंगा नदीकाठ निढोरीपासून चिखलीपर्यंत सपाट भाग आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पुराने प्रचंड नुकसान होते. यंदा चिकोत्रा खोऱ्यातही प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे उथळ असणाऱ्या चिकोत्रा नदीलाही पूर आला. नानीबाई चिखली येथील संगमाजवळ चिकोत्राच्या पाण्याने वेदगंगेचा प्रवाहच रोखून धरला होता. परिणामी पाण्याची फूग पश्चिमेकडील सपाट भागात वाढत गेली. त्यामुळे चिखलीसह म्हाकवे, परिसरातील गावाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. मात्र, पिकांचे पूर्णतः नुकसान होऊनही अधिकारी ९०टक्क्यांपर्यंतच भरपाईसाठी क्षेत्र पात्र धरत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत.
एकराला दोन गुंठयांची भरपाई...
यंदा उसाला प्रतिगुंठा १३५ म्हणजेच एकरी ५४००रुपये व भात, सोयाबीन पिकाला प्रतिगुंठा ६८ रुपये म्हणजेच एकरी २७२०रुपये इतकी तुटपुंजी भरपाई मिळणार आहे. ही भरपाई जाहीर करतानाही शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचे जाणकरांतून बोलले जात आहे.
"आमच्या१५७३ या गट नंबरातील संपूर्ण ३८गुंठे ऊसक्षेत्राचे नुकसान झाले. मात्र, केवळ ३०गुंठेच भरपाईसाठी पात्र धरले. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी थांबायला हवी, तसेच २०१९ प्रमाणे भरपाई मिळाली तरच आम्हाला हातभार लागणार आहे.’’ -
विनोद मारुती जगदाळे
शेतकरी, बानगे
कँप्शन :
पुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पूर्णतः नुकसान झालेले आणूर येथील ऊसक्षेत्र...
छाया-दत्तात्रय पाटील, म्हाकवे.