गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 10, 2022 12:10 PM2022-09-10T12:10:29+5:302022-09-10T12:12:15+5:30
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
आता नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. बरोबर १५ दिवसांनी अंबाबाईचा नवरात्रोत्सव सुरू होत असून, या काळात दरवर्षी २५ लाखांवर भाविक देवीचे दर्शन घेतात. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे मंदिर भाविकांसाठी बंद होते. फक्त पुजारी आणि देवस्थानच्या वतीने देवीचे सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. गेल्या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे जिल्हा प्रशासनाने भाविकांना ई-पासची सक्ती केली होती. त्यामुळे अनेक भाविकांना देवीच्या प्रत्यक्ष दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. यंदा मात्र कोरोना हद्दपार झाल्याने गणेशोत्सवाप्रमाणेच अंबाबाईचा नवरात्रोत्सवदेखील निर्बंधमुक्त साजरा होणार आहे. याबाबतजिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोनाच्या पूर्वी ज्याप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होत होता, त्याचप्रमाणे यंदादेखील होईल. ई-पास असणार नाही. भाविकांसाठी दर्शन मंडप, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृह अशा प्राथमिक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. सध्या देवस्थान समितीकडून नवरात्रोत्सवाची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.