कोल्हापूर : सोन्याची चेन वितळल्यानंतर निघाले तांबे, सर्वच दागिने तांबे असल्याची आरोपींची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:21 PM2018-10-15T18:21:09+5:302018-10-15T18:23:30+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांत तारण ठेवलेल्या बनावट सोन्याचे दागिने खरे की खोटे याची चाचणी करवीर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी घेतली. जप्त केलेल्या साडेतीन तोळ्यांंच्या चेनची दसरा चौकातील एका नामवंत ज्वेलर्समधील मशीनमध्ये तपासणी केली असता २१.४ कॅरेट सोने दाखविले. त्यानंतर हीच चेन वितळून तिची पुन्हा मशीनमध्ये तपासणी केली असता पूर्णत: तांबे असल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध बँकांत तारण ठेवलेल्या बनावट सोन्याचे दागिने खरे की खोटे याची चाचणी करवीर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी घेतली. जप्त केलेल्या साडेतीन तोळ्यांंच्या चेनची दसरा चौकातील एका नामवंत ज्वेलर्समधील मशीनमध्ये तपासणी केली असता २१.४ कॅरेट सोने दाखविले. त्यानंतर हीच चेन वितळून तिची पुन्हा मशीनमध्ये तपासणी केली असता पूर्णत: तांबे असल्याचे स्पष्ट झाले.
संशयितांनी मूळ तांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देऊन ते सोने असल्याचा बनाव करून बँकांची फसवणूक केल्याचे ज्वेलर्सच्या तज्ज्ञांनी सांगितले. आरोपींनीही सर्वच दागिने तांबे असल्याची कबुली दिली. इनकॅमेरा झालेल्या चाचणीचा पोलिसांनी पंचनामा केला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आनंदराव विष्णू राक्षे (४२, रा. सुभाषनगर, कोरेगाव सातारा) यांच्यासह दागिने पुरविणारा व्यापारी फरार आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), वीरशैव सहकारी बँक, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँक आणि एक पतसंस्था व तीन सराफांकडे दोन किलो ९१ ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून तब्बल ३९ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या १0 जणांच्या टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला आहे.
जप्त केलेल्या दागिने खरे की खोटे याची चाचणी सोमवारी करवीर पोलिसांनी घेतली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सरकारी पंच सर्जेराव कांबळे, बड्डू दाभाडे, फिर्यादी केडीसीसी बँकेचे चारूदत्त शंकर स्वार, संशयित आरोपी आणि पत्रकार यांच्यासमोर दसरा चौकातील एका ज्वेलर्समध्ये इनकॅमेरा साडेतीन तोळ्यांच्या चेनची चाचणी घेतली.
ज्वेलर्सच्या तज्ज्ञांनी कॅरेट मोजणाºया मशीनमध्ये चेन ठेवून तिची पारख केली. ३0 सेकंदामध्ये २१.४ कॅरेटमध्ये ८९ टक्के सोने दाखविण्यात आले. त्यामध्ये चांदी ३.७५ टक्के, तांबे ७.४, झिंक आणि कॅडबीएम शून्य दाखविले, अशी तीनवेळा चेनची चाचणी घेतली असता वेगवेगळे कॅरेट दाखविण्यात आले. त्यानंतर तीच चेन वितळून पुन्हा मशीनमध्ये चाचणी केली. त्यामध्ये २६. ६४ कॅरेटमध्ये ७५ टक्के तांबे दाखविण्यात आले. चांदी शून्य, झिंक ३. २२ आणि तांबे ७४. ७६ टक्के दाखविले. यावरून हा दागिना पूर्णत: खोटा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या संपूर्ण चाचणीचा पंचनामा पोलिसांनी केला.
वितळल्यानंतर खरे रूप स्पष्ट
तांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देऊन हे सोने बँकेत तारण ठेवले जात असे. हा मुलामा एवढा जाड होता की, बँकेच्या सोने तपासणी यंत्रालाही त्यातील खोटेपणा लक्षात येत नव्हता. काही सराफांनी टिंच बघून सोने असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. दागिने वितळल्यानंतर ते तांबे असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेले १ किलो दागिने खोटे असून तांबे असल्याची कबुली संशयित आरोपींनी चाचणीच्या वेळीच दिली. जप्त केलेल्या सोन्यामध्ये ३१ चेन, तीन अंगठ्या व कानातील एक जोडी असा बनावट माल आहे.
सराफांसह बँकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग नाही
संबंधित बँकांसाठी सोन्याचे मूल्यांकन करून देणाऱ्या सराफांची व बँकेच्या अधिकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली. मशीनमध्ये बनावट दागिने खरे असल्याचे दाखवित असल्याने यामध्ये सराफ किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग प्रथमदर्शनी दिसून येत नाही. आरोपींनी दागिने गहानवट ठेवून कर्ज उचलले होते. ते मोडून वितळले असते तर सराफांच्या लक्षात वस्तुस्थिती आली असती, अशी माहिती तपास अधिकारी सुनील पाटील यांनी दिली.