'हर हर महादेव'नंतर 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापुरातील नेसरीत शिवप्रेमी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:54 PM2022-11-08T13:54:36+5:302022-11-08T13:55:00+5:30
महेश मांजरेकरांनी नेसरी खिंडीत येऊन खरा इतिहास जानावा अशी केली मागणी.
नेसरी: 'हर हर महादेव' चित्रपटावरुन मोठा वाद सुरु असतानाच आता आणखीन एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटात शिवप्रभुंच्या पवित्र इतिहासाची मोडतोड करुन नेसरी खिंडीत बलिदान दिलेल्या सहा साथीदारांची नावे बदलली गेल्याने आज, मंगळवारी नेसरी येथे शिवप्रेमी नागरिकानी निषेध मोर्चा काढून लक्ष वेधून घेतले.
सकाळी १०च्या सुमारास बसस्थानक परिसरातील सरसेनापती प्रतापराव गुजर चौकातून निषेध मोर्चाची सुरुवात झाली. गावातील मुख्य मार्गावरून महेश मांजरेकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक समिती अध्यक्ष बालासाहेब कुपेकर, भैय्यासाहेब कुपेकर, ॲड. हेमंत कोलेकर, शिवाजीराव हिडदुगी, विलास हल्याली, एस एन देसाई, यशवंत देसाई, विश्वनाथ रेळेकर यांनी निषेध व्यक्त केला.
महेश मांजरेकरांनी आपल्या चित्रपटांत प्रतापराव गुजर व त्यांचे विश्वासू सहकारी येसाजी कंक, विठ्ठल पीळदेव अत्रे, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ, दिपोजी राऊत, सिद्धी हिलाल यांची मूळ नावे वापरावीत. त्यांचे पोशाख बदलावेत, तसेच नेसरी खिंडीत येऊन खरा इतिहास जानावा अशी मागणी केली. या शूर सरदारांनी बलिदान देऊन नेसरी खिंड पावन केली असताना व याची इतिहासात नोंद असताना सहा साथीदारांची नावे बदलून चित्रपट साकारत असल्याची तीव्र भावना अनेकांनी व्यक्त केल्या.