जयंती नाला पाठोपाठ संध्यामठही झाला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:14 PM2019-05-27T14:14:02+5:302019-05-27T14:17:11+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी सिद्धार्थनगर येथे महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी क्रिडाई, स्वरा फौंडेशन, जिल्हा बार असोसिएशन, के. एम. टी.कडील कर्मचारी यांच्यासमवेत स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता करण्यात आली.
अभियानामध्ये सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, विविध संघटनांनी सहभाग नोंदवून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जयंती नाल्याचे पात्र जेसीबीने रूंदीकरण केले. हुतात्मा पार्क गार्डन उद्यानाची व जयंती नाला सभोवतालची स्वच्छता केली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, दिलीप पोवार, माजी महापौर अॅड. महादेव आडगुळे, क्रिडाईचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना संपूर्ण नालापात्रमधील गाळ जेसीबी, पोकलँडचा वापर करून काढण्यात येत आहे. नाला पात्र रूंदीकरण करण्यात येत असल्याने जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी ‘ओव्हरफ्लो’ होऊन पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
अभियानामध्ये प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक सचिन पाटील, शेखर कुसाळे, अतिरिक्तआयुक्तश्रीधर पाटणकर, साहाय्यक आयुक्तसंजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, इस्टेट प्रमोद बराले, क्रिडाई, स्वरा फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांचे पदाधिकारी व सदस्य, गार्डन, ड्रेनेज, घरफाळा, विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयं संस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
येथे राबविली मोहीम
ही स्वच्छता मोहीम सिद्धार्थनगर, जयंती नाला पंपिंग हाऊस ते गाडी अड्डा, रिलायन्स मॉल पिछाडी ते ओढ्यावरचा गणपती मंदिर, बुद्धगार्डन ते अॅस्टर आधार हॉस्पिटल व रंकाळा तलाव संध्यामठ परिसरात राबविण्यात आली.
परिसरात स्वच्छता
हुतात्मा पार्क गार्डन उद्यानाची व जयंती नाला सभोवतालची स्वच्छता करण्यात आली. उद्यानामध्ये उपस्थित असलेले निसर्गप्रेमी व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
पाणी प्रवाही, प्रदूषणही कमी
जमा केलेला प्लास्टिक कचरा सात डंपर, दोन जेसीबीच्या साहाय्याने गोळा करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने नाला पात्र रूंदीकरणही करण्यात आले; त्यामुळे पावसाळ्यामध्ये निर्माण होणारा जादा पाण्याचा प्रवाह हा प्रभावित राहणार असून, नाल्यातून वाहणारा कचरा व प्लास्टिक यामुळे पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषणही कमी होणार आहे.