Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर भाजीपाला कडाडला, किरकोळ बाजारात दुप्पट दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:34 PM2020-07-28T14:34:56+5:302020-07-28T14:38:59+5:30
लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
कोल्हापूर : लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कोल्हापूरबाजार समितीत सोमवारी केवळ १००३ क्विंटलची आवक झाली असून, नेहमीपेक्षा ७०० क्विंटल कमी झाली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २० जुलैपासून सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यात या लॉकडाऊनमध्ये बाजार समितीही सहभागी झाल्याने मंडई बंद राहिल्या. त्यामुळे लॉकडाऊन कधी उठतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री अधिकृतरीत्या लॉकडाऊन शिथिल केल्याची घोषणा केली.
त्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीत भाजीपाला घेऊन येण्यासाठी निरोप देण्यात आले. मात्र, रात्री बारापर्यंत जेमतेम पाच-सहा गाडीच भाजीपाला आला होता. सकाळच्या टप्प्यात काही गाड्या आल्या, मात्र खरेदीदारांची गर्दी मोठी होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी समितीत आले आणि भाजीपाला कमी असल्याने दर चांगलेच कडाडले.
त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारात झाला असून, सोमवारी दिवसभर भाजीपाल्यांचे दर भडकले होते. किरकोळ बाजारात दोडका ६०, वांगी ६०, ढब्बू ८०, गवारी १००, वरणा ८०, घेवडा ८०, तर भेंडी ४० रुपये किलो होती. एरव्ही वीस रुपये किलो असणारा टोमॅटोने चांगलीच उसळी घेतली असून, ६० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. ओली मिरचीने शंभरी पार केली. शेवग्याच्या दोन शेंगा दहा रुपयांना होत्या. त्या तुलनेत कोथिंबीरचे दर काहीसे स्थिर राहिले.
ग्राहकांना दुहेरी झटका!
लॉकडाऊनमुळे सात दिवस हाताला काम नाही. त्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल्याने सामान्य ग्राहकांची भाजीप खरेदी करताना दमछाक झाल्याचे दिसले.
किरकोळ बाजारात सोमवारी भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे राहिले-
भाजी दर
- दोडका ६०
- वांगी ६०
- ढब्बू ८०
- गवारी १००
- वरणा ८०
- घेवडा ८०
- कोबी ३०
- भेंडी ४०
- ओली मिरची १००
- आल्ले ८०
- मेथी २० (पेंढी)
- पालक १५
- शेपू १५
बाजार समितीतील शेतीमालाची आवक क्विंटलमध्ये -
शेतीमाल आवक
- भाजीपाला १००३
- कांदा २९०८
- बटाटा ३२६७
- लसूण २२०
- फळे २३१