अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर हातकणंगले सभापती महेश पाटील यांचा राजीनामा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:31+5:302020-12-23T04:22:31+5:30
सभापती पाटील हे आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजपचे ५, जनस्वराज्यचे ५, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ३, शिवसेनेचे ...
सभापती पाटील हे आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजपचे ५, जनस्वराज्यचे ५, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ३, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ अशा १६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. सभापती महेश पाटील इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. पंचायत समितीसाठी येणाऱ्या निधीचा परस्पर वापर करत आहेत. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालय घोटाळ्यात पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात १६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला.
हा ठराव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला असून अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी सात दिवसांच्या आत विशेष सभेचे अयोजन करण्यात येणार आहे. या सभेनंतरच महेश पाटील सभापती पदावर राहणार की जाणार, याचा फैसला होणार आहे.
महेश पाटील यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी सभापती पदावर निवड झाली होती. सत्ताधारी भाजपा-जनसुराज्यला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीचे ५ शिवसेना - २ स्वाभिमानी शेतकरी संघट्ना- २ काँग्रेस - १ अपक्ष - १ आणि भाजपा - १ अशा १२ सद्स्यांनी एकत्र येऊन आघाडी तयार करून सभापती - उपसभापती पदांच्या निवडी केल्या होत्या. उर्वरित अडीच वर्षात आवाडे गट, स्वाभिमानी पक्ष आणि शिवसेना यांना समान आठ महिने कालावधी देण्याच्या अटीवर या निवडी झाल्या होत्या. मात्र आठ महिने संपूनही आवाडे गटाच्या महेश पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.
कोट =
ताराराणी आघाडीचे नेते राहुल आवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले की, सभापती महेश पाटील यांनी पक्षश्रेष्ठी म्हणून आपल्याकडे राजीनामा दिला आहे. जिल्हयाच्या राजकारणामध्ये आवाडे गट भाजपाबरोबर आहे. यापुढेही आवाडे गट भाजपाबरोबर राहणार आहे. भाजपा आणि जनसुराज्य तालुक्याच्या राजकारणामध्ये एकत्र असल्याने सभापती पदाबाबत ताराराणी आघाडीला कोणतीच अडचण येणार नाही. ताराराणी आघाडी-भाजपा-जनसुराज्य यापुढे एकत्र राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.