पंचगंगा प्रदूषित करून काळम्मावाडीच्या मागे

By admin | Published: December 25, 2015 12:17 AM2015-12-25T00:17:20+5:302015-12-25T00:24:37+5:30

कोल्हापूर, इचलकरंजीचे पाप : नदीकाठच्या अन्य गावांना वाली कोण?: नशिबी दूषित पाणीच

After pollution of Panchganga and behind Kalmamwadi | पंचगंगा प्रदूषित करून काळम्मावाडीच्या मागे

पंचगंगा प्रदूषित करून काळम्मावाडीच्या मागे

Next

अतुल आंबी --- इचलकरंजी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, तर इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के जबाबदार आहे, असे असतानाही या दोन्ही शहरांचा काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनद्वारे पिण्यासाठी शुद्ध पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुद्ध पाणी घेऊन वापरून पुन्हा दूषित झालेले पाणी पंचगंगा नदीतच मिसळणार. त्यामुळे नदीकाठच्या अन्य गावांना मात्र प्रदूषित पाणीच मिळत राहणार. त्यापेक्षा पंचगंगा नदीच प्रदूषणमुक्त, शुद्ध केल्यास सर्वांनाच समान न्याय मिळेल, अशी भावना नदीकाठच्या अनेक गावांतील नागरिकांनी व्यक्त केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घरगुती, मैलामिश्रित व औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी)ने दिलेल्या अहवालातही प्रदूषण असल्याचे नमूद केले आहे. कोल्हापूरला सध्या पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी घेऊन जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून शुद्ध करून पाणीपुरवठा केला जातो. तसेच इचलकरंजी नगरपालिकेनेही पंचगंगा व कृष्णा नदीतून पाणी घेऊन शुद्धिकरण करून पुरवठा केला जातो. याउलट नदीकाठच्या गावांना मात्र शुद्धिकरण प्रकल्पही उभारण्यासाठी निधी मिळत नाही. त्यामुळे पंचगंगा नदीतील प्रदूषित पाणीच थेट प्यावे लागते.
असे असतानाही प्रदूषणास मुख्य जबाबदार मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका आता कोट्यवधी रुपये शासनाकडून मंजूर करून घेऊन त्या माध्यमातून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी आणून ते पिण्यासाठी वापरणार आहेत. हे पाणी वापरून प्रदूषित झालेले सांडपाणी पुन्हा गटारी व नाल्यांमार्फत पंचगंगा नदीमध्येच सोडले जाणार. कोल्हापूर महापालिकेच्यावतीने मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असला तरी त्यालाही बराच कालावधी लोटणार आहे. इचलकरंजीत आता भुयारी गटार योजना कार्यान्वित झाली आहे, असे सांगितले जात आहे, तर एसटीपी प्रकल्पाचा अद्याप फक्त प्रयत्न सुरू आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व काही जाणकार नागरिकांच्या मते या दोन शहरांतील घरगुती व औद्योगिक सांडपाणी पंचगंगेत मिसळणे बंद झाले, तरी पंचगंगा बऱ्याच अंशी प्रदूषणमुक्त होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविताना दिखावा न करता शंभर टक्के क्षमतेने चालणारी योजना राबवावी, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे पर्यायाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह शेतीलाही चांगले पाणी मिळेल.


नदीचे प्रदूषण झाले म्हणून थेट पाईपलाईनचा पर्याय सुचविला जाणे, हेच मुळात चुकीचे आहे. प्रत्येकजण थेट पाईपलाईन म्हणत राहिला, तर नदीचे अस्तित्वच संपुष्टात येईल. अशा योजना म्हणजे निसर्गचक्राच्या आणि शहराच्या पर्यावरणीय विकासाच्या विरोधात आहे. त्यापेक्षा सांडपाण्याचेच लोंढे एकत्र करून पाईप बंद करून त्यावर उत्तम प्रक्रिया करणे योग्य ठरेल. प्रदूषण नियंत्रण करून पर्यावरण नीती अवलंबल्यास नदीचे संवर्धन होऊन सर्वांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल.
- संदीप चोडणकर (एम.एस्सी. पर्यावरण शास्त्र)

एकीकडे कोल्हापूर व इचलकरंजी शहरे राजकीय ताकद लावून काळम्मावाडीतून थेट पाणी पिण्यासाठी आणत आहेत, तर दुसरीकडे याच शहरांचे प्रदूषित पाणी पिणाऱ्या गावांना मात्र प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करायला निधीही मिळत नाही. फक्त शहरांनाच काळम्मावाडीतून थेट पाणीपुरवठा का? थेट पाणीपुरवठा करायचा असेल, तर नदीकाठावरच्या सर्वच गावांनाही करावा. त्यामुळे देशात सर्वांना समान हक्क असल्याची जाणीव होईल.- भरत खोत, ग्रामस्थ, चंदूर.


नदीवर ६४ बंधारे
पंचगंगा नदी व उपनद्यांवर मिळून कासारी १४, कुंभी १०, धामणी ५, तुळशी ९ , भोगावती ६ व त्यानंतर पंचगंगा नदीवरील ८ असे एकूण ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यामुळे नदीला ६४ तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Web Title: After pollution of Panchganga and behind Kalmamwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.