Coronavirus Unlock : शिथिलता मिळाल्यानंतर कोल्हापूर पुन्हा गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:49 PM2020-07-27T16:49:58+5:302020-07-27T16:51:34+5:30
सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले.
कोल्हापूर : सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले.
भाजी मंडई, पेट्रोल पंप, एटीएम, बँकांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून व्यवहार सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीती आणि एक दक्षता म्हणून अनेकजण अद्याप घरातच थांबून आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेला सात दिवसांचा लॉकडाऊन रविवारी रात्री संपला. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार कोल्हापूरकरांच्या सोमवारची सुरुवात झाली.
कपिलतीर्थ मार्केट, मिरजकर तिकटी, पंचगंगा नदी घाट परिसरात भाजी खरेदीला नागरिकांनी गर्दी केली. लक्ष्मीपुरी धान्य बाजारात तुरळक गर्दी राहिली. पेट्रोल पंपावर दुपारी दोन वाजेपर्यंत दुचाकीधारकांची गर्दी दिसून आली.
आठवड्याचा आणि अनलॉकचा पहिला दिवस असल्याने बँक, वीज बिल, मोबाईल बिल भरणे, आदी कामांसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती.
बहुतांश ठिकाणचे सिग्नल सुरू झाले. काही एटीएममध्ये ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. पावसाने दिलेली उघडीप आणि ऊन पडल्याने शहरातील वर्दळ वाढली. ती सायंकाळी दुकानांची वेळ संपेपर्यंत कायम राहिली. राज्य सरकारने जाहीर केलेला अनलॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावेळी शहरात नागरिकांची गर्दी उसळली होती. मात्र, कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने सात दिवसांचा लॉकडाऊन पाळला.
प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता मिळूनही शहरातील गर्दी गेल्या दोन महिन्यांच्या अनलॉकच्या पहिल्या दिवसापेक्षा कमी दिसून आली.