सात महिन्यांनंतर हरिप्रिया एक्स्प्रेस तिरूपतीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:27 PM2020-10-30T18:27:16+5:302020-10-30T18:30:13+5:30
Coronavirus, railway, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सात महिन्यांपूर्वी बंद केलेली हरिप्रिया एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स कोल्हापूर रेल्वे स्थानकातून तिरूपतीकडे रवाना झाली. या रेल्वेतून स्थानिक १५, तर एकूण १५५ पेक्षा अधिक आरक्षण झाले होते.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सात महिन्यांपूर्वी बंद केलेली हरिप्रिया एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स कोल्हापूररेल्वे स्थानकातून तिरूपतीकडे रवाना झाली. या रेल्वेतून स्थानिक १५, तर एकूण १५५ पेक्षा अधिक आरक्षण झाले होते.
दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने खास कोल्हापूरहून तिरूपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता ही रेल्वे सुरू केली होती. ही खास रेल्वे १९ तास ३५ मिनिटांमध्ये ९३० कि.मी. अंतर पार करून तिरूपती रेल्वेस्थानकावर पोहोचते.
आठवड्यातून तीनवेळा ही खास रेल्वे सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे दि. २४ मार्च २०२० मध्ये ही रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पाच वाजता ही रेल्वे तिरूपतीहून कोल्हापुरात दाखल झाली आणि शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी स्थानिक १५ व विविध स्टेशनांतर्गत झालेल्या १५५ प्रवाशांना घेऊन तिरूपतीकडे रवाना झाली.
तत्पूर्वी या रेल्वेच्या सर्व बोगींचे कोल्हापूर रेल्वे स्थानकात सॅनिटायझेशन करण्यात आले होते. ही रेल्वे ३० नोव्हेंबरअखेर खास ह्यफेस्टिव्हल स्पेशलह्ण म्हणून कोल्हापूर स्थानकातून धावणार आहे. नियमित दरापेक्षा या रेल्वेचे तिकीट १०० ते १५० रुपये इतके जादा आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.