स्टार ८३१ अनलॉकनंतर भाजीपाला ३० टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:26+5:302021-06-23T04:16:26+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर कोल्हापुरात लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर कोल्हापुरात लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली असून त्याचा परिणाम दरावर झाला आहे. भाजीपाल्याच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. शेवगा शेंग, कोबी, ओली मिरची, गवार, कारली, दोडका या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याची खरेदी-विक्री सुरू असली तरी त्याचा उठाव होत नव्हता. लग्नसमारंभ, हॉटेल बंद राहिल्याने भाजीपाल्याच्या विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत रोज ६०० क्विंटल भाजीपाला शिल्लक राहत होता. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र खरीप पेरणीमुळे स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाली, त्याचबरोबर गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाने झोडपून काढले. त्यामुळेही आवकेवर परिणाम झाला. आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. कोबी, ओली मिरची, गवार, कारली, दोडका, काकडी, वाल, फ्लाॅवर, कोथिंबीर, शेवगा शेंग, मेथीच्या दरात १५ पासून ७२ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.
वांगी, टोमॅटो, ढब्बू स्थिर
वांगी, टोमॅटो, ढब्बू, घेवडा, भेंडी, वरणा, गाजरचे दर इतर भाज्यांच्या दराएवढेच आहेत. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते स्थिर दिसत आहेत.
तुलनात्मक भाजीपाल्याचे दर रुपयात (प्रतिकिलो)
भाजीपाला २ जून २२ जून
कोबी ५.५० ७.५०
ओली मिरची १५ १७.५०
गवार ४० ५०
कारली ३० ४०
दोडका २५ ३२
काकडी १२.५० २२.५०
वाल ४५ ६५
शेवगा शेंग २५ ४२.५०
मेथी १० (पेंढी) १२ (पेंढी)
कोथिंबीर ६.५० (पेंढी) ८.५० (पेंढी)
कोट-
भाजीपाल्याचे दर वाढलेला दिसतो. मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. प्रत्यक्ष माल विक्रीसाठी गेल्यानंतर व्यापारी आपल्या हिशेबानेच खरेदी करत असल्याने भाव वाढला हे फक्त ऐकायला मिळते.
- मारुती पाटील (शेतकरी, वंदूर)
एकीकडे सततच्या लॉकडाऊनमुळे कामे नाहीत, आणि दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडले आहे.
- सोनाली शेळके (गृहिणी, पाचगाव)
लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचा उठाव नसल्याने दर कमी होते, आता मार्केट काहीसे नियमित झाल्याने उठाव होत आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ झाली आहे.
- सलीम बागवान (भाजीपाला व्यापारी, शाहू मार्केट यार्ड)
पावसामुळे भाज्यांच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला आणि त्यात मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. कडक दरामुळे शेतकऱ्यांकडून घ्यायचे कसे आणि त्याची विक्री करायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
- भारत मोहिते (भाजीपाला व्यापारी)