पुराचे गांभीर्य सांगितल्यानंतर मग पंकजा मुंडे यांची हालोंडीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:41 AM2019-08-29T10:41:02+5:302019-08-29T10:44:10+5:30
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला.
मुंडे या इचलकरंजी येथे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या निधीतील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बुधवारी दुपारी कोल्हापुरात आल्या. मात्र त्यांच्या नियोजित दौऱ्यात कुठेही पूरग्रस्त गावांना भेट देण्याचे नियोजन नव्हते.
वास्तविक जिल्ह्यातील ३५० हून अधिक गावांना महापुराचा फटका बसला असताना, जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असताना, ग्रामविकास मंत्री मुंडे या यातील काही गावांना भेटी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचा दौरा पाहिल्यानंतरच त्यांनी या गावांना भेट देण्याचे नियोजन केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्याची उलटसुलट चर्चाही सुरू झाली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बुधवारी दुपारी मुंडे या विमानाने कोल्हापुरात दाखल झाल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, गटनेते अरुण इंगवले, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुंडे यांनी अध्यक्षा महाडिक व मित्तल यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. ग्रामविकास विभागाचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबाबत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे सांगून त्यांनी इतर विभागांशीही आपण बोलणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी या दौऱ्यात एका तरी पूरग्रस्त गावाला भेट देण्याची विनंती मित्तल यांनी त्यांना केली. अखेर वाटेतच जाताना हालोंडी येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दोन्ही मंत्री तिकडे रवाना झाले.
युती निश्चित : चंद्रकांत पाटील
‘भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांची युती निश्चित आहे,’ असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यावर पाटील आले असताना त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली.