मंत्र्यांच्या तंबीनंतर यंत्रणा लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:43 AM2018-07-04T00:43:50+5:302018-07-04T00:44:03+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.
महापालिकेच्या १७ एमएलडी क्षमतेचे दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण झाले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामध्ये किमान चार टँकर पाणी व जैविक कल्चर सोडण्याची गरज आहे. ती व्यवस्था झालेली नाही. या कामाची पाहणी व प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तिथे गेले होते; परंतु तिथे महापालिकेचे कुणी अधिकारी बोलावूनही आले नसल्याने ही कार्यवाही झाली नाही. आम्ही अगोदर महापालिकेकडून योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. ती न झाल्यास कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकाºयांना फोन केल्यावर त्यांच्याकडे कार्यवाही अथवा कारवाईचे कोणतेच अपडेट्स नव्हते. याबाबत आज, बुधवारी मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, थेट पर्यावरण मंत्र्यांनी आदेश देऊनही पंचगंगा प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप व तशी लेखी तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सायंकाळी केली. यापूर्वी या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि आता थेट मंत्र्यांनी आदेश देऊनही महापालिका मात्र प्रदूषणाबाबत फारशी गंभीर नसल्याचा आरोप देसाई यांनी या तक्रारीत केला आहे.
दोषी प्रोसेसर्स
बंद करणार
इचलकरंजीतील प्रोसेसर्सच्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया पार पडते की नाही याची तपासणी करण्याबरोबरच दोषी कारखाने बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिला.