दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:50 PM2022-11-22T17:50:16+5:302022-11-22T17:50:46+5:30

दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने दूध उत्पादकाला थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही.

After the increase in milk price, animal feed prices increased, There was an increase of 30 percent | दूध दोन रुपयांनी, मात्र पशुखाद्याच्या दरात झाली 'इतक्या' टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांना झटका

संग्रहित फोटो

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’सह जिल्ह्यातील सर्वच दूध संघांनी म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने दूध उत्पादकाला थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांनी पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ केली. खाद्याच्या दरात सरासरी ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, दूध उत्पादकांना चांगलाच झटका बसला आहे. भुसा २८४०, तर सरकी पेंड ३६०० रुपये क्विंटलवर पोहोचली आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून देशांतर्गत बाजारपेठेतील दुधाची मागणी आणि दूध उत्पादन यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने दूध टंचाई भासत आहे.

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया हे दूध उत्पादनातील सर्वात मोठे देश आहेत. तिथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील दूध पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने पावडरच्या दराने एकदम उसळी घेतली. किरकोळ बाजारात दूध पावडरचे दर ३२० रुपये, तर बटरचे दर ४३० रुपये किलोपर्यंत आहेत. त्यामुळे दूध संकलनवाढीसाठी सर्वच दूध संघांनी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
  • पशुखाद्य व ओल्या वैरणीच्या दरात झालेल्या वाढीने हा व्यवसाय अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. दूध संघांनी खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात शिल्लक राहतील, असे वाटत असतानाच पशुखाद्य कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली. दूध खरेदी दरात वाढ झाल्यानंतरच पशुखाद्य कंपन्यांनी दरवाढीच्या हालचाली सुरू केल्या होत्या.


संघाने द्यायचे अन् खाद्यातून काढून घ्यायचे

दूध संघांनी दूध खरेदी दरात वाढ करून शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आणि पशुखाद्याच्या कंपन्यांनी खाद्याच्या दरात वाढ करून तो पैसा शेतकऱ्यांकडून काढून घेतला जात असल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरात शेणच राहत आहे.

दूध दर वाढल्यावरच कच्चामाल महागतो कसा?

पशुखाद्याच्या दरवाढीमागे त्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. गहू मिळत नाही, मिल बंद आहेत अशी कारणे व्यापारी सांगतात. दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतरच कच्चामाल महागतो कसा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

असा राहिला पशुखाद्याचा दर, प्रतिक्विंटल -

पशुखाद्य  पूर्वीचा दर सध्याचा दर
भुसा२१००  २८४०
भातकोंडा ८००१४००
सरकी पेंड३२००३६००
मोहरी पेंड३१०० ३७५०


भुसा, सरकी पेंडच्या दरात मोठी वाढ झाल्याने हा व्यवसाय परवडत नाही. दूध दरवाढ झाली की खाद्याचे दर वाढलेच, त्यामुळे दूध दरवाढ नको; पण खाद्याचे दर पूर्ववत करा, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. - मारुती खाडे (दूध उत्पादक शेतकरी)

Web Title: After the increase in milk price, animal feed prices increased, There was an increase of 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.