आमदार मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर 'ईडी’चे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत, तपासणी सुरु
By राजाराम लोंढे | Published: February 1, 2023 12:51 PM2023-02-01T12:51:54+5:302023-02-01T13:55:35+5:30
ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ईडी’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी‘छापे टाकले होते. यामध्ये काय सापडले, याची माहीती समजू शकली नाही मात्र गेली वीस दिवस हे वादळ शांत झालेले नाही, याची चर्चा कागल मतदारसंघात सुरु होती.
बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी तपासणी सुरु केली असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.