मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:09 PM2022-06-27T17:09:07+5:302022-06-27T17:41:02+5:30
तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले.
जयसिंगपूर : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्याने आज, जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढून हल्लाबोल केला. दरम्यान यड्रावकर गटाचे समर्थकही कार्यालयावर जमा झाले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र संतप्त शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून, पोलिसांशी झटापट करुन यड्रावकरांच्या कार्यालयावर धडक मारली. यावेळी पोलीस व शिवसैनिकात झटापट झाल्याने वातावरण तणावपुर्ण बनले होते.
यासर्व प्रकारानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्हॉटसअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले त्या लोकांनी मोर्चा काढून आम्हाला विचारायला येणं हे हास्यास्पद आहे. मोर्चा काढून चुकीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. कुठंतरी मला बदनाम करण्याचा डाव असून मी कुणी लेचापेचा नाही असा इशाराच त्यांनी विरोधक आंदोलकांना यावेळी दिला.
तर, येणाऱ्या काळात अपक्ष म्हणूनच आपली भूमिका राहील असे स्पष्ट सांगितले. विकासासोबत राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले. विकासाची गती कायम ठेवायची असल्यास एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी राहणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.