क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:46 PM2024-07-08T15:46:36+5:302024-07-08T15:47:38+5:30
कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ...
कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने त्यांना १२५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले. त्यानंतर राज्य सरकारने भारतीय संघासाठी पुन्हा ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. एकीकडे क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पाडला जात असताना हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीच्या मल्लांच्या घशाला कोरड पडली आहे. गेले दहा महिने त्यांचे तुटपुंजे मानधनही मिळालेले नाही. मानधनासह अन्य खेळांसाठी भरीव निधी देण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघासाठी सरकारकडून ११ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली. बीसीसीआयने त्यांना १२५ कोटींचे बक्षीस दिले. एकीकडे क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडत असताना राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांचे गेले दहा महिने मानधन रखडले आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी असे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय देऊन या कलेला लोकप्रियता मिळवून दिली.
गेल्या वीस वर्षात सरकार बदलले, क्रीडा खात्याचे अधिकारी आणि त्यांची मानसिकताही त्यांच्या बाबतीत बदलली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मानधनाचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, सरकारकडून मानधन दिलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात तर विभागीय क्रीडा सकुंलात जलतरण तलावासाठी चार कोटींहून अधिक पैसा पाण्यात गेला. मात्र, पैलवानांना सहा हजारांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य शासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते. मात्र, हे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून मिळालेले नाही. यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना उतारवयात मानधनासाठी तंगविले जात आहे. राज्याचा क्रीडा विभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत.
रथी, महारथी पैलवान
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूरमध्ये पहिले ऑलिम्पिकला गेलेले दिनकरराव शिंदे, पहिले ऑलिम्पिकचे पदक विजेते खाशाबा जाधव, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, पहिले रुस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार, पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, पहिले महाराष्ट्र केसरी होऊन हिंदकेसरी झालेले दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर आबा, हिंदकेसरी हजरत पटेल, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी विनोद चौगुले, हिंदकेसरी रुस्तम हिंद दादू चौगुले, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, कुस्तीसम्राट युवराज पाटील, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग असे एकापेक्षा एक पैलवान कोल्हापुरात घडले.
..ही कारणे देतात
सरकारी सेवेत प्रशिक्षणार्थी कालावधी दोन वर्षाचा आहे. खेळाचा सराव आणि नोकरी यामुळे अनेकदा हा कालावधी पूर्ण होत नाही. हा कालावधी पूर्ण केला नसल्याने वेतन दिले जात नाही. सरकारी नियम आणि सरावाची सांगड बसत नाही. त्यात नव्याने आलेले सरकार खेळाडूंच्या बाबतीत नवीन परिपत्रक काढतात. त्यामुळे खेळाडूंची कोंडी होत आहे.
वेेळेत मानधन आणि शक्य झाल्यास वाढीव मानधन किमान जिवंतपणी हिंदकेसरींना मिळावे. अनेक नेते, मंत्री यांना भेटून पैलवांना मंडळी आता थकली आहेत. हिंदकेसरींना २५, महाराष्ट्र केसरींना २० आंतरराष्ट्रीय मल्लांना १५ आणि राष्ट्रीय मल्लांना १० हजार मानधन मिळावे. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरी
शासकीय सेवेत सामावून घेतले आहे. मात्र, गेली सात वर्षे मानधन मिळालेले नाही. मानधन मिळेल की नाही, याबाबत आता विचार करणेही सोडून दिले आहे. खेळांडूबाबत कोणालाही गांभीर्य नाही. नवे खेळाडू मानधन मिळत नाही, म्हणून अन्य ठिकाणी नोकरी करत असल्याचे चित्र आहे. - राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू