कुस्तीनंतर आता कबड्डीच्या मॅट आल्या चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:03+5:302021-02-23T04:39:03+5:30
कोल्हापूर : कुस्तीच्या मॅटचा दर्जा तपासणीबाबत सोमवारी बोलावलेल्या बैठकीत कबड्डीच्या मॅट चर्चेत आल्या. त्यामुळे आता या मॅट खरेदीची ...
कोल्हापूर : कुस्तीच्या मॅटचा दर्जा तपासणीबाबत सोमवारी बोलावलेल्या बैठकीत कबड्डीच्या मॅट चर्चेत आल्या. त्यामुळे आता या मॅट खरेदीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कुस्तीच्या मॅटच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर गेली दोन वर्षे हे प्रकरण सुरू आहे. याबाबत पुरवठादाराविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. याविषयी आढावा घेण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली होती. कुस्तीच्या मॅट बदलून देताना एक मॅट दाखवण्यासाठी दालनातच आणण्यात आली. यावेळी पैलवान संभाजी वरुटे आणि पैलवान संभाजी पाटील यांनी ही मॅट कुस्तीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर अशाच आणखी ७१ मॅट पुरवठादाराने पुरवण्याचे निश्चित करण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी कबड्डीच्या मॅटचा विषय उपस्थित केला. कुस्तीसोबतच कबड्डीच्या मॅटच्या खरेदीची चौकशी व्हावी, अशी मागणी याआधीही केली असताना केवळ कुस्तीच्या मॅटची चौकशी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेव्हा सध्या कुस्तीच्या मॅटचा मुद्दा समोर आला आहे. तो संपवून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आधी चांगल्या मॅट देऊ, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी यातील काही कागदपत्रांचे वाचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत अध्यक्ष पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, राजेश पाटील यांनी भाग घेतला. कुस्तीच्या मॅटबाबतचा विषय काहीअंशी पुढे गेला असला तरी आता कबड्डीच्या मॅटचा विषय तापण्याची चिन्हे आहेत.
चौकट
स्वतंत्र चौकशीस बंधने
कुस्तीच्या मॅटबाबत गुन्हा दाखल झाला असून, आता तुम्ही स्वतंत्र चौकशी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता यामध्ये न्यायालय जो काही निर्णय देईल त्यानुसार जिल्हा परिषद कार्यवाही करेल. कबड्डीच्या मॅटबाबत तक्रार असेल तर थेट न्यायालयात न जाता आम्ही विभागीय चौकशी करू शकतो. त्यामुळे कुस्तीच्या मॅटच्या तपासाची आम्ही वाट पाहत आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.
२२०२२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापुरात कुस्तीच्या मॅटबाबत सोमवारी जिल्हा परिषदेत बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, स्वाती सासने, हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, विजय बोरगे, आशा उबाळे उपस्थित होत्या.