जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सहा तासांचे आंदोलन नाट्य संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:41+5:302021-09-08T04:30:41+5:30
कोल्हापूर : तब्बल सहा तास कोसळणाऱ्या पावसात रस्त्यावरच ठिय्या मारलेल्या महिलांच्या रुद्रावतारापुढे अखेर जिल्हा प्रशासन नमले आणि कंपन्यावर कारवाईची ...
कोल्हापूर : तब्बल सहा तास कोसळणाऱ्या पावसात रस्त्यावरच ठिय्या मारलेल्या महिलांच्या रुद्रावतारापुढे अखेर जिल्हा प्रशासन नमले आणि कंपन्यावर कारवाईची नोटीस काढली. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी दिल्यानंतर मंगळवारी दिवसभर चाललेले आंदोलन नाट्य संपले. संध्याकाळी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे दिव्या मगदूम यांनी जाहीर केले.
मायक्रो कंपन्याकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावत जात असल्याने यांच्यावर कारवाई करावी, कर्जमाफी करावी, या मागणीसाठी छत्रपती शासन महिला आघाडीतील शेकडो महिलांनी हातात काठ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी अकरा वाजता आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी बाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आक्रमक आंदोलकांमुळे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला. तोपर्यंत पावसानेही जोर धरला; पण महिला जागच्या हालल्या नाहीत. पाऊस झेलतच या महिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी लेखी पत्र वाचून दाखवले, पण यावर समाधान न झाल्याने महिला अधिकच आक्रमक झाल्या. कंपन्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, सक्तीने वसुली थांबवा, कर्ज भरणार नाही, असा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांबरोबर झटापट झाल्याने भरपावसातच या महिला रस्त्यावर चिखलातच आडव्या झाल्या. या सर्व आंदोलन नाट्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुन्हा शिष्टमंडळाला बोलावून घेत कारवाईचे पत्र दिले. यात आंदोलकांकडून करण्यात आलेल्या नऊ मागण्यांपैकी सर्वच कंपन्यांना कारवाईची नोटीस काढण्याची मागणी मान्य करण्यात आली.
०७०९२०२१-कोल-मोर्चा ०१
फोटो ओळ : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भरपावसात बसलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
(छाया : नसिर अत्तार)
०७०९२०२१-कोल-मोर्चा ०१
फोटो ओळ: मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भरपावसात बसलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
(छाया: नसिर अत्तार)
०७०९२०२१-कोल-मोर्चा ०२, ०३
फोटो ओळ : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास मज्जाव केल्यानंतर महिला रस्त्यावरच आडव्या झाल्या.
(छाया: नसिर अत्तार)०७०९२०२१-कोल-मोर्चा ०४
फोटो ओळ : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात मंगळवारी निघालेल्या मोर्चात हजारो महिला हातात काठ्या घेऊन सहभागी झाल्या होत्या.
(छाया : नसिर अत्तार)